Breaking News

‘वॉटर कप’ आणण्यासाठी बिदालचे ग्रामस्थ एकवटले

दहिवडी, दि. 6 (प्रतिनिधी) : ’सत्यमेव जयते वॉटर कप’ गावात आणायचाच या ध्येयाने प्रेरित होऊन माण तालुक्यातील बिदाल गावाचे ग्रामस्थ गट-तट विसरुन एकवटले आहेत. दगडत बांध घालणे, डीप सीसीटी खोदण्यासाठी साईट शोधून सर्वेक्षण करून त्याची मोजमापे तयार करणे, शिवारातील पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून शिवारातील जमिनीत मुरवणे. पाण्याच्या जोरावर गावात हरितक्रांती घडविण्याचा ध्यास घेऊन ’एक गाव-एक कुटुंब’ मानून सवर्जण कामाला लागले आहेत. 
गावात गटारातील वाहून जाणारे पाणी शोषखड्ड्यात मुरवण्यासाठी शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले आहे. डोंगर माथा व पायथा परिसरात ग्रामस्थ्यांनी श्रमदानातून दगडी बांध घालणे, समांतर चर खोदणे या कामाला ग्रामस्थांनी गती दिली आहे. घराघरातून महिला, पुरुष श्रमदान करण्यासाठी बाहेर पडत आहेत. कडक उन्हाची तमा न बाळगता श्रमदान जोमाने सुरू ठेवले आहे. गावाच्या वेगवेगळ्या परिसरात टीमवर्क सुरू आहे. प्रत्येक टीमला कामे विभागून दिली आहेत. प्रामुख्याने सुरुवातीला साईटची पाहणी केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या मोजमापे घेऊन आखणी केली जाते. त्यानंतर डीप सीसीटीसाठी खोदकाम करण्याचे नियोजन सुरू आहे. गावातील ग्रामस्थांचा सहभाग पाहून बाहेरगावी असणारा नोकरदार, व्यापारी, दानशूर वर्ग व स्वयंसेवी संस्था आर्थिक मदतीसाठी पुढे सरसावू लागले आहेत.
सत्यमेव जयते पाणी फौंडेशनच्या कमिटीला तांत्रिक मदतीला प्रशासनातील तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, गावातील शिक्षक मदत करत आहेत. ही टीम ग्रामस्थांना काम सुचवून व आखून देत आहेत. त्याप्रमाणे ग्रामस्थांचे काम सुरू आहे. शेतकर्‍यांच्या शेतात जावून माती मातीपरीक्षण करण्यात आले आहे. ग्रामस्थांना प्रेरित करण्यासाठी वेळू गावाची यशोगाथा असलेली चित्रफित दाखवण्यात आली. ओढे, ओघळी, डोंगरउताराचे पाणी वाहून जाणार्‍या साईटवर दगडी बांध घालण्याचे काम ग्रामस्थांनी युध्द पातळीवर हाती घेतले आहे. ग्रामस्थांमध्ये मार्केट कमिटीचे संचालक तानाजी मगर, प्रताप भोसले, शिवाभाऊ जगदाळे, संजय गांधी, अजित बोराटे, सुरेश बोराटे, सुरेश जगदाळे, नानासो चिरमे, पोपट खरात, हणमंत फडतरे, ताराचंद जगदाळे, रामभाऊ नांगरे, उत्तम ढोक, मोहन सावकार, गजानन भोसले, आजी-माजी सरपंच, विकास सेवा सोसायटीचे आजी-माजी चेअरमन, विविध पक्षाचे पदाधिकारी, नोकरदार, शिक्षकवर्ग, ग्रामस्थ श्रमदानात सहभागी झाले होते.