राज्यातून जास्तीत जास्त निर्यात करावी
पुणे, दि. 25 - युरोपमध्ये 5 हजार मे.टन, अमेरिकेमध्ये 1500 मे.टन, जपान येथे 150 मे.टन अशा प्रकारे आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून राज्यातून आंबा हंगाम 2017 मध्ये 50 ते 70 हजार मे.टन आंबा निर्यात होईल अशी अपेक्षा राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री.सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली असून कृषि पणन मंडळातर्फे अद्ययावत करण्यात आलेल्या निर्यात सुविधांचा वापर आंबा आणि इतर फळे व भाजीपाला निर्यातीसाठी करून राज्यातून जास्तित जास्त निर्यात करावी असे आवाहन श्री.देशमुख यांनी निर्यातदारांना केले आहे.राज्यात उत्पादित होणार्या हापूस व केसर आंब्यास जागतिक बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आंबा निर्यातीसाठी कृषि पणन मंडळाने वि-किरण सुविधा, व्हेपर हिट ट्रिटमेंट आणि उष्णजल प्रक्रिया वाशी नवी मुंबई आणि गोरेगांव येथे उभारलेल्या आहेत. सदर सुविधा निर्यातीच्या दृष्टीकोनातून नुकत्याच अद्ययावत करण्यात आल्या आहेत. सन 2006 पर्यंत अमेरिकेत भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी होती. अमेरिकेने सन 2006 नंतर अमेरिकन बाजार पेठ काही अटी व शर्तींवर भारतीय आंब्याकरीता खुली केली. आंब्यावर वि-किरण प्रक्रिया करून आयातीस परवानगी दिल्यामुळे सन 2007 पासून अमेरिकेत आंब्याची निर्यात सुरू झालेली असून या वर्षी 1500 मे.टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट अमेरिकेसाठी ठेवण्यात आले आहे. जपान देशाची बाजार पेठ आंब्यासाठी सन 2006 साली खुली झाली असून या वर्षी 150 मे.टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषि पणन मंडळाने जगभरात निर्यातीसाठी वि-किरण सुविधा, व्हेपर हिट ट्रिटमेंट आणि उष्णजल प्रक्रिया या प्रक्रियांसाठी सुविधा उभारलेल्या आहेत. तथापि, अमेरिका, जपान येथील निरिक्षकांच्या निरिक्षणाखाली आंब्याची निर्यात करावी लागते. आंबा हंगामामध्ये अमेरिका आणि जपानमधील निरिक्षक हे वेळेत उपस्थित रहावे यासाठी मा.ना.श्री.सुभाष देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे आंबा निर्यात हंगामामध्ये वेळेत सुरू होण्यास प्रारंभ झालेला आहे. अमेरिकेतून श्री.केनेथ आर. लॉ, कोरिया येथून श्री.ह्यून कॉगटॉक आणि जपान येथून श्री.मसाहिको सेकिया हे तज्ज्ञ निरिक्षक तथा प्लॅन्ट कॉरंटाईन ऑफिसर मुंबई येथे उपस्थित असून त्यांच्या निरिक्षणाखाली संबंधित देशांना आंब्याची निर्यात सुरू झालेली आहे.इराण देशातही भारतीय आंब्यास मोठी बाजार पेठ असून याकरीता कृषि पणन मंडळाने गोरेगांव येथील सुविधा अद्ययावत केलेली असून सदर सुविधेस इराणच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट दिली असून इराण देशाची बाजार पेठ भारतीय आंब्यास उपलब्ध होणे लवकरच शक्य होईल. मँगोनेटअंतर्गत नोंदणीकृत शेतकर्यांचाच माल निर्यातीसाठी वापरण्यात येत असून यामुळे शेतकर्यांच्या शेतावरून निर्यातदार आंबा खरेदी करतात. यामुळे शेतकर्यांना चांगला दर प्राप्त होत असून हाताळणीत आणि वाहतूकीत होणारे आंब्याचे नुकसान कमी होण्यास मदत होत आहे. शेतावर पॅक केलेला आंबा सुविधा केंद्रावर आल्यानंतर त्यावर विहित पद्धतीने प्रक्रिया करून तसेच संबंधित देशांच्या मानकानुसार संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून आंब्याची निर्यात करण्यात येते. यामुळे अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांसाठी विकिरण प्रक्रिया करणे, जपान, नेदरलँड, कोरिया या देशांसाठी व्हेपर हिट ट्रिटमेंट प्रक्रिया करणे आणि युरोप देशात उष्णजल प्रक्रिया करून आंब्याची निर्यात करण्यात येते. यासाठीच्या सुविधा सहकार व पणन मंत्री मा.ना.श्री.सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत करण्यात आल्या आहेत. तसेच सदर सुविधांचा कार्यक्षम पद्धतीने वापर करणेबाबत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. सद्यस्थितीत अमेरिकेमध्ये आंब्याची निर्यात ही हवाईमार्गे करण्यात येते. हवाईमार्गे वाहतूकीचे दर जास्त असल्याकारणाने अमेरिकेतील बाजार पेठेत इतर देशांच्या आंब्याच्या तुलनेत भारतीय आंब्याची किंमत जास्त होत असल्याकारणाने अमेरिकेत समुद्रमार्गे निर्यातीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतील स्पर्धेत भारतीय आंबा टिकू शकेल. या पार्श्वभूमिवर आंब्याच्या समुद्रमार्गे निर्यातीसाठी जे निर्यातदार प्रयत्न करतील त्यांना आंब्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्राधान्य देण्याबाबतच्या सूचना श्री.सुभाष देशमुख यांनी पणन मंडळास दिलेल्या आहेत.