Breaking News

मिना नदी स्वच्छता अभियानाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात

अकोले, दि. 25 -  नारायणगाव (वार्ताहर)- नारायणगाव येथील जागतिक आरोग्य दिनापासून सुरु झालेल्या अविरत स्वच्छता अभियानच्या तिसर्‍या टप्प्याच्या कामाची सुरुवात आज दि (24) करण्यात आली.
 तिसर्‍या टप्प्याच्या कामाची सुरुवात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांचे हस्ते करण्यात आली.याप्रसंगी उपसरपंच जंगल कोल्हे, अमित बेनके, नारायणगाव विकास सोसायटीचे अध्यक्ष आशिष फुलसुंदर, ग्रा. पं. सदस्य योगेश (बाबू) पाटे, विपुल फुलसुंदर, मकरंद पाटे, सुरज वाजगे, रोहिदास केदारी, राजू बोरा, विनायक मोरे, संजय वारुळे, अविनाश घोलप, अभियानाचे मुख्य प्रवर्तक दिपक वारुळे, मार्गदर्शक जितेंद्र गुंजाळ, समन्वयक मेहबूब काझी आदी  मान्यवर उपस्थित होते.
मेहेरपुलापासून ते इंदिरानगर नारायणगाव पर्यंतच्या दोन टप्प्यांत या अभियाना अंतर्गत नदीपात्र विस्तार, राडारोडा हटविणे, इंदिरानगर लगत झालेला मोठा कचरा साठा हटविणे, नदी प्रवाह सुस्थितीत करणे, नदीपात्रांतर्गत स्वच्छता करणे, नेवकर पुलावरील वारूळवाडी बाजूला खाचखळगे भरणे इ. कामे पूर्ण झाली आहेत. सांडपाण्याचा मोठा साठा नदी पात्रात तयार झाल्यामुळे तिसर्‍या टप्प्याचे काम सुरु करणे गरजेचे असल्याने या कामाची सुरुवात यावेळी करण्यात आली . या टप्प्यानंतर हरीस्वामी येथील बंधार्‍यापासून पुढे शनिवार बाजारापर्यंतच्या चौथ्या टप्प्याचे काम हाती घेणार असल्याचेही मुख्य प्रवर्तक दिपक वारुळे यांनी सांगितले.
यावेळी अतुल बेनके म्हणाले की, नारायणगाव आणि वारूळवाडीच्या दृष्टीने हे अभियान अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कुठल्याही शासकीय मदतीशिवाय लोकसहभागातून चाललेल्या या कामाचा आदर्श समाज नक्कीच घेईल. मिना नदी पात्रातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शुद्धीकरण प्रकल्प मंजूर करण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील असेही  बेनके यांनी सांगितले.
लोकसहभागातून चाललेल्या या कामासाठी स्व. जयसिंग भुजबळ यांचे स्मरणार्थ 5 हजार, भागेश्वर मित्रमंडळा तर्फे 7 हजार, आदर्श मित्रमंडळा तर्फे  5हजार, गणेश देशमुख  5हजार, राहुल बनकर 5 हजार, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळ  2100 इ. रोख स्वरुपात मदत केली आहे. तसेच परिसरातील अनेक नागरिक आपल्या शुभकार्यानिमित्त,  या अभियानासाठी मदत करीत आहेत असे जितेंद्र गुंजाळ यांनी सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिपक वारुळे यांनी केले व आभार जितेंद्र गुंजाळ यांनी मानले.