Breaking News

एकतर्फी प्रेमातून कराडमध्ये विद्यार्थिनीशी गैरवर्तन

कराड, दि. 26 (प्रतिनिधी) : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. दरम्यान, संशयित युवकाने बदनामी करण्याची भीती दाखवून गाडी अंगावर घालून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
कराड शहराच्या विद्यानगर परिसरातील एका महाविद्यालयात संबंधित विद्यार्थिनी आणि संशयित युवक शिकत आहेत. हा युवक संबंधित विद्यार्थिनीस क्लासला तसेच महाविद्यालयात जाताना वारंवार त्रास देत होता. त्यामुळे यापूर्वी संबंधित विद्यार्थिनीने त्या युवकाविरूध्द कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जानंतर पोलिसांनी संबंधित युवकाला बोलावून समज दिली होती. 17 एप्रिलपासून सकाळी साडेसात ते दहा या अडीच तासांच्या वेळेत त्या विद्यार्थिनीचा क्लास असतो. क्लास सुरू झाल्यापासून संबंधित युवक क्लास सुरू होण्यापूर्वी आणि क्लास सुटताना बाहेर उभा असतो. मात्र, रविवार, 23 एप्रिल रोजी सकाळी संबंधित विद्यार्थिनी क्लासमध्ये जात असताना त्या युवकाने गैरवर्तन केले. त्या युवकाने विद्यार्थिनीस तू क्लासमध्ये जाऊ नकोस, मी परत येतो असे सांगितले. तसेच काही वेळाने परत येत त्याने विद्यार्थिनीचा उजवा हात पिरगाळून माझ्यासोबत बाहेर फिरायला चल, आली नाहीस तर बदनामी करेन. तसेच तुझ्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर विद्यार्थिनीने नातेवाईकांसह पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. या तक्रारीनुसार संशयित युवकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.