Breaking News

दारूबंदीसाठी मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार : तृप्ती देसाई

कराड, दि. 26 (प्रतिनिधी) : आगरकरांच्या गावात मला भाषण करायला मिळतंय, हे मी माझं भाग्यच समजते. संपूर्ण दारूबंदी हे आता माझे मुख्य लक्ष आहे. गुजरात, बिहारमध्ये दारूबंदी होत असेल तर महाराष्ट्रात का होत नाही? वर्धा, भंडार्‍यात दारुबंदी यशस्वी होत असेल तर सगळीकडे झाली पाहिजे. येत्या तीन महिन्यात राज्यात संपूर्ण दारुबंदी झाली नाही तर मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला.टेंभू, ता. कराड येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भूमाता ब्रिगेडचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजकुमार डोंबे होते. यावेळी माधुरी टोणपे, रावसाहेब क्षीरसागर, अनिल कांबळे उपस्थित होते.
तृप्ती देसाई म्हणाल्या, राज्यात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी महिला हातात लाटणे घेऊन रस्त्यावर उतरतील. महिलांनी साथ दिली तर भूमाता ब्रिगेड दारूबंदी यशस्वी करून दाखवेल. महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी गावातील दारू विक्री व्यावसायिकांना विरोध करा. महिला अत्याचाराविरोधात आमचे एक पथक कार्यरत आहे. महिलांनी चांगल्या कामासाठी आता हातात काठी घेऊनच रस्त्यावर उतरायचे आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अंधश्रध्देचा पगडा आहे. देवाने भक्तात भेदभाव मानला नाही, मग भेदभाव करणारे तुम्ही-आम्ही कोण? पुरूष मंदिरात प्रवेश करतात तर मग महिलाही प्रवेश करणारच. महिलांना प्रवेश नाकारणे हा महिलांवरील अत्याचार आहे. आज समाजाला मुलगी नको आहे. तिला नकुशी म्हणतात. समाजाने मुलीचे स्वागत केले पाहिजे. समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक असून हुंडा प्रथेविरोधात आमचा लढा सूरू आहे. दारूबंदीकरिता शेकडो रणरागिणी उभ्या राहील्या तर हा लढा निश्‍चितपणे यशस्वी होईल, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माधुरी टोणपे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच तात्यासो लेंगरे, ग्रामपंचायत सदस्य शालन नलवडे, उषाताई जाधव, सुलतान डांगे, सुनिता पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.