Breaking News

विभागीय आयुक्तपदी चंद्रकांत दळवी रुजू

पुणे, दि. 26 - पुणे विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार आज चंद्रकांत दळवी यांनी मावळते विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम् यांच्याकडून स्वीकारला. यावेळी विभागीय आयुक्त श्री दळवी यांचे श्री. चोक्कलिंगम आणि पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी उपायुक्त सर्वश्री सुधाकर तेलंग, कविता द्विवेदी, अजित पवार, निलेश सागर, पुणे विभागीय माहिती उपसंचालक मोहन राठोड, प्र. जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील तसेच विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. दळवी यांनी यापूर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पुणे जिल्हाचे जिल्हाधिकारी, यशदाचे महासंचालक तसेच जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिअभिलेख यापदांवर काम केले आहे. जानेवारी 2015 पासून सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यापदावर कार्यरत होते.
श्री. दळवी यांनी जिल्हाधिकारी पुणे पदी कार्यरत असताना प्रशासन गतिमान करण्याच्या दृष्टीने ’झिरो पेंडन्सी’ आणि ’डेली डिस्पोजल’ हा उपक्रम राबविला. यावेळी जिल्ह्यातील संपूर्ण महसूल प्रशासनास या कामाकरीता आयएसओ : 9000 :2008 हे प्रमाणपत्र मिळाले. जमाबंदी आयुक्तपदी काम करतांना ’ई-महाभूमी’ प्रकल्प राबवून राज्यातील भूमिअभिलेख आधुनिकीकरण करण्यावर भर दिला.  नागरिकाना ऑनलाईन जमिनीचे अभिलेखे उपलब्ध करुन देण्यात आले. सहकार आयुक्तपदी काम करतांना ’ई सहकार’ पोटर्लच्या माध्यमातून राज्यातील 2 लाखापेक्षा अधिक सहकारी संस्थेची सर्व माहिती नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार, उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.