Breaking News

विनयभंगप्रकरणी सहा महिन्याची सक्तमजुरी

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सतिश अनिल वाघमारे (वय 19, रा. खोडद, ता. सातारा) याला पहिले तदर्थ अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रीती घुले यांनी सहा महिने सक्तमजुरी व 1 हजार रूपये दंड, तो न दिल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
8 ऑगस्ट 2015 रोजी दुपारी दीडच्या सुमारास चौदा वर्षाची मुलगी नदीवर कपडे धुण्यासाठी निघाली होती. त्यावेळी सतिशने या अल्पवयीन मुलीचा रस्ता अडवला. तिच्याशी गैरवर्तन करून तिला खोलीमध्ये नेण्यासाठी ओढू लागला. त्यावेळी मुलीने आरडाओरडा केल्याने त्या ठिकाणी शेतामध्ये काम करणार्‍या मुलीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सतिश तेथून पसार झाला. बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर फौजदार ए. एच. वाघोले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकार व बचाव पक्षाचा जोरदार युक्तीवाद झाला. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधिशांनी आरोपीला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. ज्योती दिवाकर यांनी काम पाहिले.