Breaking News

सातारा परिसरातील विकास कामे होणार

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) : छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या सातार्‍याजवळील संगम माहुली येथील समाधीच्या जीर्णोध्दारासाठी 92 लाख 46 हजारांच्या निधीचे अंदाजपत्रक बनवले असून ते सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेसाठी पाठवणार असल्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. दरम्यान, 2017-18 चा 243 कोटींचा वार्षिक नियोजन आराखडा मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने व कार्यकारी अभियंता वाघमोडे यांनी परिसराची बुधवारी दुपारी पाहणी केली. 
शिवतारे म्हणाले, जिल्हा वार्षिक आराखडा 243.65 कोटींचा असून अनुसूचित जाती योजनांचा आराखडा 77.65 कोटी, आदिवासी योजनांचा आराखडा 1.86 कोटी असा एकूण 323.16 कोटींचा प्रारूप आराखडा आहे. महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळावर घाट बांधण्यासंबंधी आमदारांच्या सूचनेनुसार त्यात बदल केला जाईल, अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणार्‍या रस्त्यावर पथदिवे बसवले जातील, तसेच आमदार शिवेंद्रराजे यांच्या मागणीनुसार रस्त्याची दुरूस्तीही केली जाईल. क्षेत्र महाबळेश्‍वरला ’क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रस्ताव केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्रीही लक्ष देत आहेत. महिनाभरात त्याबाबतचा निर्णय होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.