Breaking News

उमरकांचन गावच्या पुनर्वसनासाठी तडसर गावचा समावेश करा : पालकमंत्री

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) : वांग मराठवाडी धरणग्रस्त मौजे उरमकांचन गावच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्यातील तडसर गाव आराखड्यात समावेश करावे, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्या.
कृष्णा खोरे महामंडळाच्या प्रलंबित पुनर्वसन प्रश्‍नांबाबत पालकमंत्री शिवतारे यांनी येथील नियोजन भवनात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार शंभूराज देसाई, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, सांगलीचे अपर जिल्हाधिकारी संजय चव्हाण, पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, तुषार ठोंबरे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे आदींसह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
सुरुवातीला आमदार देसाई यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रलंबित प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्‍न सविस्तरपणे सांगितले. यावर पालकमंत्री शिवतारे म्हणाले, वांग मराठवाडी धरणासाठी मौजे उमरकांचनमधील  62 जणांच्या पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्यातील तडसर गावात जमिन उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. शासनाच्या नव्या धोरणानुसार अशा जागा पुनर्वसनासाठी प्राधान्याने शेतकर्‍यांना देण्यात याव्यात. त्यासाठी पुनर्वसन आराखड्यात तडसर गावचा समावेश करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या गावाचा समावेश झाल्यास सांगली अपर जिल्हाधिकार्‍यांकडून प्रस्ताव शासनाला जाईल. मौजे उमरकांचन गावचा पुनर्वसनाचा प्रश्‍न शासन दरबारी आपण निकालात काढू. महात्मेवाडी गावातील 46 कुटुंबांची घरे पाण्याच्या कडेला आहेत. याबाबत जलसंपदा विभागाने पाण्याची रेषा अंतिम करावी. त्याचबरोबर प्रकल्प ग्रस्तांकडून शपथ पत्र घेवून भूखंडांचे वाटप करावे. मौजे कुशी गावातील लोकांना निश्‍चितपणे नागरी सुविधा पुरविल्या जातील, असे आश्‍वासन त्यांनी दिले.