Breaking News

दिपाच्या ओढ्याच्या खोलीकरणास शुभारंभ

कराड, दि. 06 (प्रतिनिधी) : सह्याद्रि सहकारी साखर कारखाना व ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्याने कारखाना कार्यक्षेत्रातील कराड तालुक्यातील राजमाची येथील सुर्ली घाटाकडून येणार्‍या दिपाच्या ओढ्याचे खोलीकरणासह रूंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच झाला. याप्रसंगी कारखान्याचे संचालक अशोकराव पाटील-पार्लेकर, कार्यकारी संचालक आर. सी. बडगुजर, एक्स्पांशन सिव्हील इंजिनिअर उदय पाटील, वाहन विभाग प्रमुख विलासराव क्षीरसागर व ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती.
आवर्षण प्रवण परिस्थितीत कार्यक्षेत्रातील गावांमधील ओढे, बंधारे, तलाव यातील गाळ काढून खोलीकरण व रूंदीकरण करण्यासाठी कारखान्याने स्वतःचे पोकलॅन्ड मशीन खरेदी करण्याबाबत देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने एक पोकलॅण्ड मशीन खरेदी केले आहे. या मशीनच्या सहाय्याने यापूर्वी कराड तालुक्यातील गायकवाडवाडी, किवळ, निगडी, करवडी, मेरवेवाडी, गोसावेवाडी, कोरेगांव तालुक्यातील न्हावी बु।, वेळू, रहिमतपूर, जायगांव, कन्हेरखेड अशा अनेक गावांत संबंधीत गा्रमस्थांच्या मागणीनुसार गावातील ओढे, बंधारे, तलाव यांतील गाळ काढून त्याची खोलीकरण व रूंदीकरण करण्याचे काम पूर्ण करून दिले आहे. पावसाळ्यात त्यामध्ये चांगला पाणीसाठा होवून, त्याचा ग्रामस्थांना चांगला फायदा झाला. त्याचप्रमाणे यंदाही कराड तालुक्यातील राजमाची येथील ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार, कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने राजमाची गावातील सुर्ली घाटाकडून येणार्‍या दिपाच्या ओढ्यातील गाळ काढणेच्या कामासाठी कारखान्याचे पोकलॅण्ड मशीन उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी लागणार्‍या डिझेलसाठी गा्रमस्थांनी सहकार्य केले आहे. खोलीकरणातून निघणारी माती, गाळ ग्रामस्थांनी स्वखर्चाने आपल्या शेतात नेवून टाकायचा आहे. या मशीनच्या सहाय्याने ओढ्यातील गाळ काढून त्याचे खोलीकरण व रूंदीकरण झाल्यावर पावसाळ्यात ओढ्यात जास्तीचे पाणी साठवले जावून, ग्रामस्थांना त्याचा नक्कीच फायदा होईल, असे अशोकराव पाटील-पार्लेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी सुरेश पाटील, आनंदा माने, विश्‍वास पाटील, रामचंद्र बांदल, संपतराव पाटील, मुरलीधर कांबळे, आप्पासाहेब माने, विलास माने, किसन पाटील, विश्‍वास डुबल यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.