Breaking News

खटावच्या युवकांच्या श्रमदानातून शिवकालीन जलस्त्रोतांचे पुनरूजीवन

खटाव, दि. 26 (प्रतिनिधी) : खटाव येथील छावा ग्रूपच्या युवक सदस्यांनी विठ्ठल-रखुमाई मंदीराशेजारील शेकडो वर्षांपूर्वीचा शिवकालीन जलस्त्रोत (हेळ) श्रमदानाने पुनरुजीवित केला. दुष्काळ सदृष्य स्थितीमध्ये या हेळातून दररोज चार हजार लीटर स्वच्छ पाण्याचा उपसा होत असल्याने परिसरातील लोकांना दिलासा मिळाला आहे. छावा ग्रूपच्या वतीने दोन ठिकाणी पाणपोई सुरु करण्यात आली आहे.
दुष्काळाची स्थिती कायम असून उन्हाच्या झळा तीव्र होवू लागल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात सर्वत्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अवर्षणप्रवण भागातील गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लोकांना पाण्याचे महत्व समजू लागल्याने जलसंधारणाची कामे केली जात आहेत. जुन्या जलसंरचनांना नवसंजीवनी दिली जात आहे. खटावमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण होवू लागली आहे. ग्रामपंचायतीने उपाययोजना केल्या आहेत. येथील छावा ग्रूपच्या सदस्यांनी एकत्र येवून शिवकालीन जलस्त्रोत पुनरुजीवित करण्याचे काम हाती घेतले. 25 ते 30 युवकांनी एकत्र येवून श्रमदान केले. पाण्याचा हेळ त्यातील गाळ काढून स्वच्छ केला. हेळाच्या भिंती दगड आणि सिमेंटमधे बांधून घेतल्या. सध्या पुनरुजीवित केलेल्या हेळातून दररोज चार हजार लीटर स्वच्छ पाण्याचा उपसा होत आहे. आसपासच्या लोकांना टंचाई काळात थोडाफार दिलासा देण्याचे काम युवकांनी केले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हूणन छावा ग्रूपने दोन ठिकाणी पाणपोई सुरु केली आहे.