Breaking News

वडनेर बुद्रुकला मुक्ताईदेवीचा मोठा यात्रौत्सव

अहमदनगर, दि. 23 - पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक या गावामध्ये दिनांक 24 रोजी एप्रिल  सोमवारी मुक्ताईदेवीची मोठी यात्रा भरणार आहे. या यात्रेनिमित्त परिसरातील गावातील मोठ्या संख्येने लोक  दर्शन घेण्यासाठी येत असल्याने यात्रेच्या संयोजन समितीने भाविकांना पिण्याच्या पाण्याची तसेच इतर व्यवस्था केली आहे. 
यात्रेनिमित्त मंदिरामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आले आहे. त्यामध्ये सकाळी 9 वाजता देवीला चौकीपाताळ शेरनी आणि मांडवडहाळे याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 11 वाजता देवीस नैवद्य दाखविला जाणार असून सायंकाळी 7 वाजता देवीची पालखी छबिन्यातून मिरवणूक काढण्यात येईल. त्याचबरोबर रात्री 10 वाजता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला भन्नाट कार्यक्रम ’तुमच्यासाठी कायपण घुंगराच्या नादात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरामध्ये नवसाला पावणारी देवी अशी भाविक भक्तांमध्ये श्रद्धा आहे तसेच या यात्रेनिमित्ताने कामानिमित्त मुंबई, पुणे असे बाहेरच्या शहरामध्ये असलेले सर्व लोक गावात एकत्र येतात आणि त्यामाध्यमातून गावाची एकी टिकून राहते असे प्रतिपादन वडनेर बुद्रुकच्या नुकतीच निवड झालेल्या विद्यमान सरपंच सौ. स्वातीताई अनिल नर्‍हे यांनी केले आहे. परिसरातील नागरिकांनी या यात्रेला उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन सरपंच सौ. स्वातीताई अनिल नर्‍हे तसेच यात्रेच्या संयोजन समितीने केले आहे.