Breaking News

कर्जमाफीसाठीची संघर्ष यात्रा गुरूवारी सातारा जिल्ह्यात येणार

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) : भाजप सरकारच्या निष्क्रीय कारभाराविरोधात तसेच राज्यातील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांनी काढलेेली संघर्ष यात्रा गुरूवार, दि. 27 रोजी सातारा जिल्ह्यात येत आहे. गुरूवारी दुपारी 4 वाजता दहिवडी येथे जाहीर सभेचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
आमदार गोरे म्हणाले, राज्यव्यापी संघर्ष यात्रेच्या पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, हिंगोली, लातुर, सोलापूर, पुणे, बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात संघर्ष यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. तिसर्‍या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघणार आहे. यानिमित्ताने दोन्ही काँग्रेससह एकवटलेल्या सर्वच विरोधकांना शक्तीप्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.
दहिवडी येथे होणार्‍या सभेस विधानसभेतील विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच दोन्ही काँग्रेसच्या आमदारांच्या तोफा सरकारवर धडाडणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.