Breaking News

जय वाघाच्या बेपत्ता बछड्याची शिकार, श्रीनिवासनचा मृतदेह आढळला

चंद्रपूर, दि. 27 - चंद्रपुरात काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या जय वाघाच्या बछड्याची शिकार झाल्याचं समोर आलं आहे. श्रीनिवासन या बछड्याचा मृतदेह आढळल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली. आशियातील सर्वात मोठा वाघ अशी जयची ओळख आहे. श्रीनिवासनची शिकार करणार्‍या शिकार्‍यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. विद्युतस्पर्शाने श्रीनिवासनचा जीव घेतल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे. श्रीनिवासन या बछड्याच्या अवयवांची तस्करी करुन उर्वरित भाग पुरल्याचं त्यांनी सांगितलं.
नागभीडपासून पाच किलोमीटर अंतरावर श्रीनिवासनचा मृतदेह आढळला. महादेव इरपाते या शेतकर्‍याच्या शेतात बछड्याचा मृतदेह सापडला. याच ठिकाणापासून अर्ध्या किमी अंतरावर दोन दिवसांपूर्वी श्रीनिवासनचा कॉलर बेड सापडला होता. नागपुरातून बेपत्ता झालेला ‘जय’ वाघ सापडल्याचा दावा तेलंगणा सरकारनं डिसेंबर महिन्यात केला होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून जय बेपत्ता होता. जय वाघ तेलंगणाच्या पैनगंगा जंगलात दिसल्याचा रिपोर्ट तेलंगणाच्या वृत्तवाहिन्यांनी दिला होता. या वृत्ताला तेलंगणाचे वनमंत्री जुगारामण्णा यांनीही दुजोरा दिला होता.
नागपूरच्या उमरेड अभयारण्याची ओळख बनलेला जय हा तरणाबांड वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी 100 हून अधिक स्वयंसेवकांनी मोहीम राबवली होती. तब्बल 250 किलो वजन असलेला हा तरणाबांड वाघ या अभयारण्याची ओळख बनला होता.