Breaking News

ओबीसींची नव्याने जनगणना तातडीने करण्याची मागणी

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मागणी

अहमदनगर, दि. 26 - केंद्र व राज्यसरकारने देशातील ओबीसींची नव्याने तातडीने जनगणना करून त्याची आकडेवारी घोषीत करावी अशी सामुहिक मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या अहमदनगर येथील नक्षत्र लॉन्स येथे पारपडलेल्या राज्यकार्यकारिणी बैठकीत करण्यात आली. तसेच यावेळी संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्याविषयी चिंता व्यक्त करून ओबीसी जनगणना करण्याच्या मुद्यावर तालुका पातळीपासून केंद्र स्थरावर पाठपुरावा करण्याचा मुख्य ठराव करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय महात्मा समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे,उपाध्यक्ष बापू भुजबळ, डॉ.कैलास कमोद, पार्वतीबाई शिरसाठ, दीपक वाढई, प्रा.दिवाकर गमे, अ‍ॅड.बाबुराव बेलसरे, अ‍ॅड. सुभाष राऊत, वैशाली गुंजकर, प्रदीप वैद्य, अनिता देवतकर, डॉ.संजय गव्हाणे, आबा खोत, चक्रधर उगले, दत्ता खरात, आशा झोरे, प्रितीश गवळी, प्रा.जयंत भंडारे, दिलीप भुजबळ यांच्यसह राज्यभरातील जिल्हाध्यक्ष राज्यकार्यकारिणी सदस्य,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आघाडी सरकारच्या कालावधीत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना हाती घेतली होती. मात्र, केंद्रात सरकार बदलल्यानंतर ओबीसींची जनगणना पूर्ण करण्यात आली नाही. विशेष म्हणजे देशातील एस.एसी तसेच एस.टी प्रवर्गाची जनगणना सरकारने पूर्ण करून त्याची आकडेवारी घोषीत केली. त्यामुळे देशातील ओबीसींची नव्याने जनगणना होऊन त्याची आकडेवारी तातडीने घोषीत करण्यात यावी अशी मागणी आज अहमदनगर येथे झालेल्या राज्यकार्यकारिणी बैठकीत करण्यात आली. तसेच यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुका पातळीपासून केंद्र सरकारपर्यंत निवेदन,शिष्टमंडळ भेट, प्रसंगी आंदोलन करण्यात येऊन त्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा असा मुख्य ठराव करण्यात आला. त्याबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांची बंद झालेली शिष्यवृत्ती सुरु करून त्यांना ती लवकरात लवकर देण्यात यावी. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतील संघटनात्मक बदल, तसेच संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. बैठकीच्या सुरवातीस शोक प्रस्ताव मांडून दिवंगत सदस्य, संपादक गोविंद तळवळकर, प्राचार्य गजमल माळी, शोभा चोपडे, बबन गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सदर बैठकीप्रसंगी राज्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडणूक आलेल्या अखिल भारतीय महत्मा फुले समता परिषद सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सदर बैठकीचे नियोजन विभाग प्रमुख अंबादास गारुडकर, जिल्हाप्रमुख सुभाष लोंढे, मच्छिंद्र गारुडकर, दत्ता जाधव यांनी केले होते.