Breaking News

वडनेर बुद्रुकच्या सरपंचपदी स्वातीताई नर्‍हे यांची निवड

अहमदनगर, दि. 26 - निघोज गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील वडनेर बुद्रुक या राजकीय दृष्टिकोनातून महत्वपूर्ण समजल्या सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या गावाच्या सरपंचपदी उच्चविभुषित असलेल्या स्वातीताई अनिलराव नर्‍हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी तसेच गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष लक्ष्मण विष्णू बोर्‍हाटे त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील सैनिक बँकेचे संचालक श्री. शिवाजीराव बाबुराव सुकाळे  यांनी अभिनंदन केले आहे आणि त्यांना भावी कार्यास शुभेछया दिल्या आहेत. सौ. स्वातीताई या पेशाने माध्यमिक शिक्षिका असून आपल्या शिक्षकी न्यानाचा उपयोग गावाच्या समस्या सोडविण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्याची आवड आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रभावी हातखंडा यामुळे स्वातीताई यांची निवड झाली आहे.
अकरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतमध्ये सौ. स्वातीताई अनिल नर्‍हे यांनी गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. सरपंचपदी एका महिलेची निवड झाल्यामुळे महिलांच्या समस्यांना प्राधान्य देणार असून गावामध्ये बेरोजगार तसेच परावलंबी महिलांना स्वावलंबन आणि रोजगार प्राप्त करून देण्यासाठी महिला बचत गट स्थापन करणार असल्याचे स्वातीताई यांनी सांगितले.