Breaking News

स्थापत्यकलेसोबत विद्यार्थ्यांनी सृजनशीलता जोपासावी : फेगडे

नाशिक, दि. 17 - स्थापत्यकलेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी सृजनशीलता जोपासावी असे आवाहन वास्तुविशारद मकरंद फेगडे यांनी केले. आयडिया कॉलेजच्या एक्सक्लेम 2017 उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन इनव्हायर्नमेंट अँण्ड आर्किटेक्चर अर्थात आयडिया कॉलेजचे वार्षिक प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. 
या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जयेश शहा, महाविद्यालयाचे डीन विवेक पाटणकर आदी उपस्थित होते. माणसाच्या उत्क्रांतीपासून त्याचा अधिवास अर्थात त्याचे घर हेच त्याच्या विकासाचे प्रतीक झालेले दिसते. तो ज्या वातावणात राहतो, त्यानुसार तो घर बांधत आला आहे. अगदी गुहेत राहात असल्यापासून ते आताच्या सर्व सोयीसुविधांनीयुक्त आणि आकाशाला भिडणारी घरे त्याने बांधलेली आहेत. हाच स्थापत्यकलेचा इतिहास या प्रदर्शनात जिवंत केला आहे.
स्थापत्यकलेमधील अकरा शैलींवर भर देत जगप्रसिद्ध वास्तुविशारद आणि त्यांच्या प्रतिकृती येथे उभारल्या आहेत. यात पहिली प्रतिकृती शैली निओ क्लासिक वास्तूमधील अल्टेस म्युझिअम असून, वास्तुविशारद कार्ल स्निकनर, बर्लिन र्जमनी येथे 1823 ते 1830 या काळात वास्तू बांधलेली आहे. यात वास्तूमध्ये बांधलेला डोम बाहेरून दिसत नाही. टेटलीन टॉवर हे रशियात बांधलेले असून, यातून पुढे स्थापत्यकलेतील अनेक डिझाइन तयार झालेले आहेत. बाहाऊस यामध्ये बांधकामात पहिल्यांदाच काचेचा वापर करण्यात आला. तरी अत्यंत साधेपणाने त्याची उभारणी केलेली आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद क्युबिझम यांची वास्तू द सेन्तेरिया यात पहिल्यांदाच स्टीलचा वापर करण्यात आला. त्यानंतर किंबेल आर्ट म्युझिअम हे टेक्सासमध्ये असून याच्या बांधकामातील प्रकाश योजना ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सीग्राम बिल्डींग ही न्यूयॉर्कमध्ये असून जगातील उंच इमारतींमध्ये तिची गणना होते. लोयोला चॅपल हे भारतातील केरळमध्ये असून याची उभारणी स्थानिक साहित्यापासून अत्यंत साधेपणाने केलेली आहे. चर्च ऑन वॉटर हे जपानमध्ये असून निसर्ग आणि वास्तू यांची सुंदर सांगड घातलेली दिसते. याशिवाय सिडनीतील प्रसिद्ध ओपेरा हाऊस हा वास्तू कलेचा उत्तम नमुना मानला जातो. अशा प्रसिद्ध वास्तूंच्या प्रतिकृती या प्रदर्शनात साकारलेल्या आहेत.