Breaking News

महिला बालकल्याण समितीवर भाजपचे वर्चस्व

नाशिक, दि. 17 - महापालिकेची एकहाती सत्ता काबीज करणार्या भारतीय जनता पक्षाने स्थायी समितीपाठोपाठ महिला व बालकल्याण समितीवरदेखील वर्चस्व मिळविले आहे. महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांच्या नावांची घोषणा महापौरांकडून शनिवारी महासभेत करण्यात आली असून, त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक पाच, तर विरोधक शिवसेना तीन, काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे.
महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. तीन दिवसांपूर्वी महापौर भानसी यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेत सभागृहातील तौलनिक संख्याबळानुसार महिला समितीवर जाणार्या सदस्यांचा कोटा निश्‍चित केला होता. त्यानुसार त्या-त्या पक्षांच्या गटनेत्यांना आपापल्या पक्षाकडून इच्छुक असलेल्या नगरसेवकांच्या नावांची शिफारस करण्यास सुचविण्यात आले होते. मात्र, स्थायी समितीवर जाण्यासाठी उड्या टाकणारे नगरसेवक सेवाभावी कामकाजाची सर्वाधिक संधी असलेल्या महिला बालकल्याण समितीवर जाण्यास इच्छुक नसल्याने आज महासभा सुरू होईपर्यंत गटनेत्यांकडून सदस्यांच्या नावांची शिफारस पत्रे महापौरांना सादर करण्यात आली नव्हती. महासभा सुरू झाल्यानंतर महापौरांनी पुन्हा सूचना केल्यानंतर गटनेत्यांकडून नावे सादर करण्यात आली. यानंतर महापौरांनी समिती सदस्यपदी भाजपच्या कावेरी घुगे, प्रियंका घाटे, भाग्यश्री ठोमसे, सरोज अहिरे, शीतल माळोदे, शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, नयना गांगुर्डे, पूनम मोगरे व राष्ट्रवादीच्या समीना मेमन यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे जाहीर केले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ समसमान असल्याने समितीच्या एका सदस्यपदासाठी या दोन पक्षांमध्ये टाय झाला होता. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या अंतर्गत समझोत्यानुसार समितीची एक जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली. या समितीवर भाजपचे सर्वाधिक सदस्य नियुक्त झाल्याने सभापतीही भाजपचाच होणार हे आता स्पष्ट झाले आहे.