Breaking News

समाधानी वृत्तीने रहाणे ही देखील एक भक्तीच-हभप संजय महाराज धोंडगे

अहमदनगर, दि. 23 - संसारावरील प्रेम करून विपत्ती काळातही समाधानी वृत्तीने रहाणे ही देखील एक भक्तीच असल्याचे प्रतिपादन त्र्यंबकेश्‍वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानचे अध्यक्ष कीर्तन केसरी हभप संजय महाराज धोंडगे यांनी केले.
नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणात गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कीर्तन महोत्सवातील तीसरे पुष्प गुंफताना हभप धोंडगे महाराज हे बोलत होते.
हेचि थोर भक्ति आवडे देवा,संकल्पावि माया संसाराची,ठेविले अनंते तैसेचि राहावे,चित्ती असू द्यावे समाधान या अभंगावर निरूपण करतांना हभप धोंडगे महाराज यांनी महाभारतातील द्रोपदी, सुभद्रा,कुंती, यांचे उदाहरण देत थोर भक्ति कशाला म्हणतात याचे सुन्दर विवेचन केले.
महाभारताचे युध्द संपल्यानंतर अश्‍वथामाने द्रोपदीच्या सर्व पुत्रांचा वध केला,शोक विव्हल द्रोपदी समोर मुसक्या बांधून अश्‍वथामाला केले असता द्रोपदी ला विचारले याला कोणती शिक्षा द्यावी तेव्हा द्रोपदीने उत्तर दिले की अश्‍वथामास सोडून द्या कारण त्याची आई दुःखी होईल कारण मी सुध्दा आई आहे यालाच म्हणतात थोर भक्ती अशी अनेक उदाहरणे हभप धोंडगे महाराजांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
भारतीय राज्य घटनेवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव असल्याचा मुद्दा स्पस्ट करतांना हभप धोंडगे महाराज म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटना लिहिली असली तरी त्यांच्यावर महात्मा फुले यांचा प्रभाव होता महात्मा फूलेंचा संत तुकाराम महाराज यांचा प्रभाव होता हे उदाहरणासहित स्पस्ट केले
यावेळी राहता येथील पंचायत समितीचे सभापती
भाऊपाटील कातोरे यांनी संत पूजन केले त्रिंबकेश्‍वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हभप संजय महाराज धोंडगे यांचा सोहळा संयोजक हभप उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.