पंतप्रधान पीक विमा योजना पाथर्डीला साडे नऊ कोटीची नुकसान भरपाई आ.राजळेंची माहिती
अहमदनगर, दि. 21 - पंतप्रधान पिक विमा योजनेतंर्गत जिल्हयात सर्वाधीक 9 कोटी 69 लाख रुपयाची पंतप्रधान पिक विमा नुकसान भरपाई पाथर्डी तालुक्यात मंजुर झाली असल्याची माहीती आ. मोनिका राजळे यांनी दिली. याबाबत पत्रकारांशी माहीती देतांना आ. राजळे म्हणाल्या की, सन 2016-17 या हंगामात बाजरी व भुईमुग या पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत एच.डी.एफ.सी. एर्गो इन्शुरन्स कंपनी पुणे यांनी नुकसान भरपाई रक्कम मंजुर केली आहे. पाथर्डी तालुक्यातील खरीप हंगामातील बाजरी व भुईमूग या पिकासाठी 18 हजार 182 शेतकर्यांनी विमा कंपनीकडे आपली विमा रक्कम जमा करुन सहभाग घेतला होता. नुकसान झालेल्या क्षेत्रावरील कोरडगांव, टाकळीमानुर या मंडळ विभागासाठी हेक्टरी 9 ंहजार 200 इतकी नुकसान भरपाई रक्कम मंजुर झाली आहे. पाथर्डी व माणिकदौंडी या मंडळासाठी नुकसान भरपाई रक्कम विमा कंपनीने मंजुर केलेली नाही. जिल्हयात पाथर्डीला सर्वाधीक नुकसान भरपाई मिळाल्याने शेतकर्यांना मोठा लाभ या योजनेतंर्गत झाला आहे. शेतकरी कायमच पडलेले बाजारभाव, दुष्काळ यामुळे आर्थीक अडचणीत असतो. त्यातुनच नैराश्यातून शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतो. अल्प उत्पन्न व बँक आणि सहकारी संस्थांचे कर्ज घेवून शेती करणार्या शेतकर्यांसाठी पंतप्रधान पिक विमा योजना ही जिवनदायी ठरणारी आहे. गत वर्षभरात तालुक्यात कृषी, महसुल व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांव स्तरावर जावून योजनेचे महत्व सांगीतले. त्यातुनच शेतकर्यांनी या योजनेते सहभाग घेतला. अल्पसा विमा हप्ता भरुन मोठी नुकसान भरपाई रक्कम शेतकर्यांना मिळाली आहे. कर्ज माफीसारख्या अपेक्षावर शेतकर्यांनी न बसता आपल्या पिकाचा विमा घेतला तर मोठा लाभ होऊ शकतो. शेतकर्यांना शाश्वत आधार देणारी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अस्तीत्वात आली आहे. त्यामुळे प्रत्येक पिकाचा विमा घेवून शेतकर्यांनी निश्चींत रहावे असे आवाहन आ. राजळे यांनी केले आहे. नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा सहकारी बँकेमार्फत कर्जदारांच्या समंतीने व्याज खाती जमा करण्याचे काम सुरु झालेले असल्याचेही राजळे यांनी सांगीतले.