Breaking News

इमानच्या बहिणीच्या आरोपांनंतर डॉक्टरांचा उपचारास नकार

मुंबई, दि. 27 - जगातील सर्वात वजनदार महिला इमान अहमदच्या बहिणीच्या आरोपांनंतर डॉ. लकडावाला आणि टीमने तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळं आता इमानला अबूधाबीला नेलं जाण्याची शक्यता आहे. इमानची बहिण शायमा हिने उपचारानंतर इमानची प्रकृती खालावल्याचे आरोप केले होते. इमानच्या शरीरात रक्ताच्या गाठी झाल्याने तिला हालचाल करता येत नसल्याचा आरोप शायमाने केला होता. तसंच मेडिकल रिपोर्टवर आक्षेपही शायमाने घेतला होता.
दरम्यान उपचारानंतर 500 किलो वजन असणार्‍या इमानचं वजन मोठ्या प्रमाणात घटल्याचा दावा डॉ. लकडावाला यांच्या टीमनं केला होता. इमानला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून तिची काळजी घेतली जात आहे. शिवाय तिच्या प्रकृतीत सुधारणाही झाली असून तिचं वजन 500 किलोंहून 171 किलोंवर आलं आहे, असा दावा डॉ. मुझफ्फल लकडावाला यांनी केला. इमानला रुग्णालयात 11 फेब्रुवारी रोजी दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयाने तिला दाखल करुन घेताना तिचं वजनही करुन घेतलं नाही. आणि केलं असेल तर त्यांनी ते सिद्ध करुन दाखवावं, असं आव्हान इमानची बहिण शायमा यांनी दिलं होतं.