Breaking News

प्रेग्नन्सी गुप्त ठेवायची होती : सेरेना

न्यूयॉर्क, दि. 27 - महिला टेनिसची सुपरस्टार सेरेना विल्यम्सनं आपण बाळंतपणानंतर यथावकाश आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन करु, असं आश्‍वासन देऊन आपल्या चाहत्यांना दिलासा दिला. त्यावेळी आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपलं बाळही उपस्थित असेल, असा विश्‍वास तिनं व्यक्त केला. टेड कॉन्फरन्समध्ये पत्रकार गेल किंगसोबत गप्पांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेरेनानं तिच्याशी दिलखुलास बातचीत केली. गरोदरपणाची बातमी शक्य तितके महिने गुप्तच ठेवण्याचा आपला प्रयत्न होता. पण आपल्याच अनवधानानं बिकिनीतला तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि ती बातमी फुटली असं सेरेनानं सांगितलं.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या दोनच दिवसआधी आपण गरोदर असल्याचं कळल्याची कबुलीही तिनं दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळायचं की, नाही याबाबत मी द्विधा मनस्थितीत होते, असंही सेरेना म्हणाली. माझं खेळणं बाळासाठी धोकादायक ठरु शकलं असतं, त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला. शक्य तितका ताण आणि थकवा टाळण्याचा प्रयत्न केल्याचंही सेरेनाने स्पष्ट केलं.