Breaking News

भारतीय संस्कृतीचे जतन करणे गरजेचे अ‍ॅड. उज्ज्वल निकम

पुणे, दि. 17 - भारतीय संस्कृतीमध्ये परदेशी वावटळ येऊ लागले आहेत. त्यामुळे जन्म दिलेल्या आई-वडिलांना मुले वृद्धाश्रमात राहायला भाग पाडतात. तेव्हा आपली संस्कृती लयाला जाते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे. असे मत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
पुण्यातील आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘लक्ष्मी-वासुदेव विधिभूषण पुरस्कार’ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अ‍ॅड. निकम म्हणाले, मला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले; परंतु आई-वडिलांच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद होत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांचे ज्येष्ठांचे स्थान अतुल्य आहे. याची आठवण हा पुरस्कार माझ्या भावी पिढीला कायम करुन देत राहिल.
महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने अ‍ॅड. निकम यांना पुरस्कार प्रदान केला. सन्मानपत्र, सरस्वती चिन्ह, एक लाख रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. आदित्य प्रतिष्ठानच्या 34 व्या वर्धापनदिनिमित्त टिळक स्मारक मंदिर येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपुर्ण निकम कुटुंबीय उपस्थित होते. यानिमित्त गुरुदेव शंकर अभ्यंकर लिखित ‘शंकर रामायण’(बालकाण्ड) या ग्रंथाचे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले. गुरुदेव शंकर अभ्यंकर म्हणाले, स्मृतिग्रंथांनी समाजाला आचार, विचार आणि प्रायश्‍चित्त दिले. त्यांचे जतन व शिकवण वैश्‍विक संत विद्यापिठातून देण्याचा मानस आहे.
 त्याचबरोबर संस्कृतीची अष्टांगे (धर्मकारण, राष्ट्रकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, कला-क्रीडा, विज्ञान आणि वाङ्मय) ज्या व्यक्ती आपल्या प्रचंड कार्याने समृद्ध करतात, त्यांना आदित्य प्रतिष्ठानतर्फे लक्ष्मी-वासुदेव पुरस्कार देउन सन्मानित करण्यात येते. यावेळी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही आपले मनोगात व्यक्त केले.
पुरस्कार सोहळ्याच्या सुरुवातीला राष्ट्रदेवतेची उपासना ही राष्ट्रवंदना या कार्यक्रमाद्वारे उत्तम गीतांतून जितेंद्र अभ्यंकर आणि आदित्य अभ्यंकर, मृण्मयी फाटक यांनी सादर केली. यानंतर प्रतिष्ठानच्या कार्यालयात गेली 28 वर्षे निष्ठेने कार्य करणार्‍या दत्तात्रय सावंत यांना प्रतिष्ठानतर्फे ‘श्रध्दाश्री पुरस्कार’ देण्यात आला. संस्थेच्या कार्यात ज्या कार्यकर्त्यांचा किंवा कर्मचार्‍यांचा मोलाचा सहभाग असतो त्यांना ‘श्रध्दाश्री पुरस्कार’ हा पुरस्कार दर दोन वर्षानी देण्यात येतो. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्‍वस्त अपर्णा अभ्यंकर, तर सूत्रसंचालन रश्मी तुळजापूरकर यांनी केले.