Breaking News

आयपीएलमध्ये धोनीच्या विक्रमाशी उथप्पाची बरोबरी

पुणे, दि. 27 - कोलकात्याचा यष्टिरक्षक रॉबिन उथप्पानं पुण्याच्या तीन फलंदाजांना यष्टिचीत करण्याचा पराक्रम गाजवला. आयपीएलमध्ये एकाच सामन्यात तीन फलंदाजांना यष्टिचीत करणारा तो दुसराच यष्टिरक्षक ठरला. याआधी महेंद्रसिंग धोनीनं दोनदा अशी कामगिरी बजावली होती. पुण्याविरुद्धच्या लढतीत उथप्पाच्या तत्परतेमुळे अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी आणि मनोज तिवारीला माघारी परतावं लागलं.
कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पानं रचलेल्या 158 धावांच्या भागिदारीच्या जोरावर कोलकात्यानं पुण्याचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयाच्या बळावर पुण्याने आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. हा सामना गहुंजेच्या एमसीए स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पुण्यानं कोलकात्याला विजयासाठी 183 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. पण गंभीर आणि उथप्पानं दुसर्‍या विकेटसाठी रचलेल्या 158 धावांच्या भागिदारीनं ते आव्हान अगदीच मामुली ठरवलं.
रॉबिन उथप्पानं 47 चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकारांसह 87 धावांची खेळी उभारली. गंभीरनं 43 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह 62 धावांची खेळी केली. पुण्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अन्य फलंदाजांनी केलेल्या जबाबदार खेळींच्या जोरावर रायझिंग पुणेनं कोलकात्याविरुद्ध 20 षटकांत पाच बाद 182 धावांची मजल मारली. या सामन्यात स्टीव्ह स्मिथनं 37 चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद 51 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेनं 41 चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह 46 धावांची तर राहुल त्रिपाठीनं 23 चेंडूंत सात चौकारांसह 28 धावांची खेळी उभारली. धोनीनंही 11 चेंडूंमध्ये 23 तर डॅनियल ख्रिस्तियननं 6 चेंडूंत 16 धावा कुटल्या.