Breaking News

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन

मुंबई, दि. 27 - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतंच त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. अखेर आज 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील हरकिशन दास रुग्णालायत त्यांनी 11 वा. 20 मिनिटांनी अखेरचा श्‍वास घेतला. विनोद खन्ना शेवटचे ‘एक थी राणी’ या सिनेमात दिसले होते. यापूर्वी 2015 मध्ये शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ या सिनेमातही विनोद खन्ना पाहायला मिळाले होते.
या महिन्याच्या सुरुवातीलाच विनोद खन्ना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील गिरगावच्या सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिचर्स सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्जही मिळाला होता. मात्र प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाली नसल्याने, ते देखरेखीखाली होते. विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा ‘एक राणी ऐसी भी’चा ट्रेलर लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला होता. बिग बी अमिताभ बच्चन या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र प्रकृती बिघडल्याने विनोद खन्ना हजर राहू शकले नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांचा रुग्णालयातील एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोवरुन त्यांच्या प्रकृतीचा अंदाज बांधता येत होता.
विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्‍चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर, अकबर, अँथोनी’ यांसारख्या शानदार सिनेमात काम केलं होतं. विनोद खन्ना यांनी करिअरची सुरुवात निगेटिव्ह भूमिकेने केली होती. नंतर ते हिरो बनले. विनोद खन्ना यांनी 1971 च्या ‘हम तुम और वो’ मध्ये प्रमुख भूमिका साकारली. विनोद खन्ना यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब अवलंबलं. सध्या ते पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार होते. विनोद खन्ना यांचे दोन विवाह झाले. त्यांनी 1971 साली गीतांजली यांच्याशी विवाह केला. अभिनेता अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना हे त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलं आहेत. 1975 साली विनोद खन्ना ओशो यांचे अनुयायी झाले. त्यानंतर ते पाच वर्षांसाठी रजनीशपुरम या ठिकाणी गेले. पाच वर्षांसाठी कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर त्यांचा गीतांजली यांच्याशी घटस्फोट झाला. 1990 साली त्यांनी कविता यांच्याशी दुसरा विवाह केला. साक्षी आणि श्रद्धा या त्यांच्या दुसर्‍या पत्नीच्या मुली आहेत.