Breaking News

नागठाणे येथील मारामारीत सहाजण जखमी; परस्परविरोधी तक्रारी दाखल

सातारा, दि. 5 (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या मारामारीत दोन्ही बाजूचे सहाजण जखमी झाल्याची घटना सोमवारी नागठाणे, ता. सातारा येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात झालेल्या परस्परविरोधी फिर्यादींवरून दोन्ही बाजूच्या 14 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
विकास बबन मोहिते (वय 30) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की तुझा भाऊ शेखर, हा धक्का मारून का गेला, असा जाब विचारून राहत्या घरासमोर रस्त्यावर लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत आपण स्वत:, वडील बबन जिजाबा मोहिते व आई शालन बबन मोहिते, असे तिघे जखमी झालो. त्यावरून अनिकेत अनिल मोहिते, गणेश सुनील मोहिते, अक्षय संपत मोहिते, संजय नारायण मोहिते, अनिल शंकर मोहिते, हणमंत कृष्णा मोहिते, विमल लक्ष्मण मोहिते, विमल संपत मोहिते आणि नलिनी सुरेश मोहिते, अशा 9 जणांवर बेकायदा जमाव जमवून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धनाजी लक्ष्मण मोहिते (वय 45) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की तुम्ही केस करून काय झाले, असे म्हणत विकास बबन मोहिते, शेखर बबन मोहिते, बबन जिजाबा मोहिते, शालन बबन मोहिते आणि रूपाली उर्फ गंगूबाई बबन मोहिते यांनी लोखंडी गज, लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच चावा घेतला. यामध्ये आपण स्वत:, विमल लक्ष्मण मोहिते आणि नलिनी सुरेश मोहिते, असे तिघेजण जखमी झाले. या फिर्यादीवरून वरील पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या गुन्ह्यांचा तपास अनुक्रमे हवालदार खुडे आणि सहाय्यक फौजदार कुंभार करत आहेत.