Breaking News

सातार्‍यात लवकरच पासपोर्ट कार्यालय

सातारा, दि. 05 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट केंद्र सुरु करण्यासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. सातार्‍यात पोस्ट खात्याच्या कार्यालयामार्फत पासपोर्ट केंद्र लवकरच सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती खा. श्री  छ. उदयनराजे भोसले यांनी दिली. 
जागतिकीकरण व मुक्त अर्थव्यवस्थेमुळे अनेक लोकांना जगभरात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आताच्या घडीला पासपोर्ट अत्यंत महत्वाचा झाला आहे. जिल्ह्यात पासपोर्ट काढणार्‍यांची संख्या मोठी आहे. सद्या पुणे येथील पासपोर्ट कार्यालयाकडून पासपोर्ट मिळतात. काही दिवसांपूर्वी ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे वेळेमध्ये बचत होऊन कामाला गतीमानता आली आहे. सातारसारख्या विकसनशील भागातील पासपोर्ट काढण्यास इच्छुक व्यक्तींना पासपोर्टसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व माहिती देण्यासाठी पुण्याला जावे लागते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागण्याबरोबरच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरुपी उपाय शोधण्यात आला असून सातारा येथे पोस्ट ऑफिस कार्यालयात, पासपोर्टचे केंद्र सुरु करण्याची मागणी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे. या मागणीला स्वराज यांनी तत्वत: मान्यता दिल्यामुळे नजीकच्या कालावधीत सातार्‍यात पासपोर्टचे केंद्र सुरु होईल, अशी माहिती खा. भोसले यांनी दिली.