Breaking News

यूपीच्या शेतकर्‍यांना एक लाखापर्यंत कर्जमाफी, योगी सरकारचा निर्णय

लखनौ, दि. 05 - उत्तर प्रदेशच्या शेतकर्‍यांना एक लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली आहे. सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकर्‍यांची कर्जमाफी करु हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द अखेर उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारने खरा करुन दाखवला. योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये या बहुप्रतीक्षित, बहुचर्चित निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. उत्तर प्रदेशातल्या एकूण 2 कोटी 15 लाख शेतकर्‍यांचं तब्बल 36 हजार 359 कोटींचं कर्ज माफ करण्यात आलं आहे.
लघु आणि सीमांत शेतकर्‍यांचा यात समावेश करण्यात आला असून कर्जमाफीसाठी 1 लाखांची मर्यादा ठरवण्यात आली. पीक कर्जासाठी राष्ट्रीय किंवा इतर कुठल्याही सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जांचा यात समावेश आहे. यूपीतल्या एकूण शेतकर्‍यांपैकी 92.5 टक्के शेतकर्‍यांना या कर्जमाफीचा फायदा होईल, असा दावा सरकारने केला आहे. खरंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगींचा शपथविधी 19 मार्चरोजीच झाला. मात्र त्यानंतर तब्बल 16 दिवसांनी पहिली कॅबिनेटची बैठक बोलावली गेली. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय पहिल्या कॅबिनेटमध्येच पूर्ण करण्याचा जो शब्द प्रचारसभेत मोदींनी दिलेला होता, त्यावर तोडगा काढण्यासाठी मंथन सुरु असल्यानंच ही पहिली बैठक इतकी लांबल्याचं बोललं जात आहे.