Breaking News

गीता जौहरी गुजरातच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक

अहमदाबाद, दि. 05 - गुजरातच्या विजय रुपाणी सरकारने मंगळवारी राज्याच्या महासंचालकपदासाठी गीता जौहरी यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेमुळे गीता जौहरी यांना राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत. गीता जौहरी यांच्याकडे नोव्हेंबरपर्यंत गुजरात पोलिसांच्या महासंचालक पदाची जबाबदारी असेल. यानंतर त्या पोलीस सेवेमधून निवृत्त होतील.
मूळच्या तामिळनाडूच्या रहिवासी असलेल्या गीता जौहरी 1982 मध्ये पोलीस सेवेत दाखल झाल्या. गुजरात केडरच्या पहिल्या महिला आयपीएस आहेत. त्यांचे पती अनिल जौहरी हे देखील केंद्राच्या वनविभागात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. वास्तविक, याआधी या पदावर 1980 च्या बॅचचे पीपी पांडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण पीपी पांडे यांच्या नियुक्तीला महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आणि गुजरातचे निवृत्त पोलीस महासंचालक जूलियो रिबेरो यांनी आक्षेप घेतला. तसंच त्यांच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. पीपी पांडे हे इशरत जहाँ प्रकरणातील एक आरोपी असल्याचं रिबेरोंनी याचिकेत म्हटलंय. रिबेरो यांच्या आक्षेपानंतर पीपी पांडे यांनीही राजीनामा देण्याची तयारी दाखवली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गुजरात सरकारला त्यांचा राजीनामा स्वीकारावा लागला.