Breaking News

बाणेरमध्ये कारने उडवल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू

पुणे, दि. 18 - पुण्यात बाणेरमध्ये रस्ता ओलांडणार्‍या दोन चिमुकल्यांचा भरधाव आय 10 कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघांसह कारचालक महिलाही गंभीर जखमी झाली आहे. अपघात झालेले पाचही जण डी मार्टमधून खरेदी करून घरी परतत होते. रस्ता ओलांडताना दुभाजकावर येऊन थांबले असताना भरधाव आलेल्या कारने पाचही जणांना उडवले. यामध्ये त्या दोन चिमुकल्यांसह दोन महिला व एक पुरुषाचा समावेश होता.
इशिता विश्‍वकर्मा, साजिद शेख (वय 4) या दोघा चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे तर सजाद शेख, निशा शेख, पुजा विश्‍वकर्मा, अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहे. यांच्यासोबत कारचालक महिला देखील जखमी झाली आहे.
बाणेरमधील वसुधा सोसायटीसमोर आज दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होते. रस्ता ओलांडताना गाड्यांची रहदारी सुरु असल्याने तिघेही दुभादकावर उभे होते. मात्र, भरधाव वेगात आलेल्या ख20 (चक - 12. ॠत. 8734) गाडीने त्यांना धडक दिली. या दुर्घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलांची आई (दोन्ही महिला) तसेच त्यांच्या सोबत साजद शेख गंभीर जखमी झाली आहे.
मुलांना धडक देणारी गाडी चालक महिला पुण्याहून बालेवाडीच्या दिशेने जात होती. बाणेरमध्ये आल्यावर तिचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तिने दुभाजकावरील तिघांना जोरदार धडक दिली. ती एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचे बोलले जात आहे. अपघातात चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे. अद्याप पोलिसांनी या महिलेला अटक केलेली नाही.