Breaking News

राजकीय सत्तासंपादनातील अपयश !

दि. 06, एप्रिल - दोन दिवस दु:खात गेले, दोन दिवस वाट पाहण्यात गेले, अख्खे आयुष्यच ‘भाकरी’चा अर्धचंद्र शोधण्यात गेले कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या या ओळी एका कामगाराचेच नव्हे तर सार्‍या बहुजन समाजाच्या आयुष्याच्या व्यथा मांडणार्‍या आहेत. मात्र आत्ता बहुजन समाजातही अनेक व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवित आहेत.  व्यवस्थेने त्यांना दिलेल्या स्थानापेक्षा त्यांनी बरीच वरची मजल मारली तरीही व्यवस्थेत राजकीय सत्तासंपादनात त्यांना यश येतांना दिसत नाही. बहुजन समाजाच्या सगळ्या स्तरांना एकत्रित आणून राजकीय सत्तासंपादनाचा म्हणजे सत्तेची भाकरी शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु भाकरी मिळविण्यासाठी मनापासूनचे जे श्रम असावे लागते तसा बहुजन समाज सत्ता मिळविण्यासाठी मनापासून प्रयत्न करतांना दिसत नाही. ज्या सत्तेमुळे त्यांचे सर्वच नसले तरी बहुतांश प्रश्‍न सुटू शकतात. त्यासाठी काही काळ प्रतिक्षा करणे गरजेचे असते. म्हणून सत्ताधारी पक्षांच्यामागे जावून किंवा नव्याने जे सत्तेत येवू पाहत आहेत त्यांच्या मागे जावूनही फार काही साध्य होवू शकत नाही. ‘पक्षी दिसताच पंख मागणे’, ‘आकाश दिसताच हवा मागणे’ असला छंद बरा नाही. एका कवीवर्यांच्या या ओळी बहुजन समाजातील सत्ता शोधकांना लागू होतात. त्या ऐवजी आपल्या पंखाचे बळ एवढे वाढवूया की त्यात आत्मविश्‍वासाची ताकद निर्माण केली पाहिजे. पक्षांच्या पंखात उडण्याचे बळ कमी आणि त्यांच्या निश्‍चयात अधिक असते. त्यामुळेच पंखाच्या बळाला न जुमानता पक्षी हजारो किलोमिटरचा प्रवास करुन स्थलांतर करीत असतात. असे बळ बहुजन समाज घटकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. हे पंखाचे बळ कोणताही प्रस्थापित व्यक्ती किंवा समाज येवून देवू शकत नाही. हे बळ केवळ ज्या अन्नपदार्थांचे जे आपण सेवन करतो त्यामुळे येवू शकत नाही. तर हे निश्‍चयाचे मानसिक बळ आहे. यासाठी संयम आणि धैर्य या दोन्हीही गोष्टींची आवश्यकता आहे. मात्र त्याही पेक्षा आपल्या पिढीला काही त्याग करण्याचीही आवश्यकता आहे. आम्ही आज जे निर्माण करु ते कदाचित उद्याच्या आमच्या पिढीला उपयोगात येईल. निर्सगाचे निरिक्षण केले असतात जे झाड आपण लावत असतो त्याची फळे लावणार्‍याला नव्हे तर त्यांच्या नंतर येणार्‍या पिढीला मिळत असतात. त्यामुळे कोणत्यातरी पिढीला त्याग करावा लागणार आहे आणि त्याची जाणिव आपल्याला झाल्यामुळे तो आपण केला तर अधिक बरे. नाहीतर ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे प्रत्येक पिढीला प्रस्थापित समाज वापरुन घेण्याची परंपरा तशीच पुढे जात राहील. त्यामुळे नारायण सुर्वे यांनी ज्या काळात आपले आयुष्य ’भाकरीचा अर्धचंद्र’ शोधण्यात व्यतित केले तसे दिवस आता या पिढीला राहीले नाहीत. किमान आपल्या कर्तृत्वाने काही संधी निर्माण केल्या जावू शकतात. त्या आपण आपल्याच करायला हव्यात. येणारा काळ हा आपलाच आहे. कवीवर्य सुरेश भटांच्या शब्दात सांगायचे तर ‘लाख द्रोणाचार्य येवो, काळ आता डरणार नाही, नवा एक लव्य येतो आहे, दान अंगठ्याचे करणार नाही’ या ओळींप्रमाणे आता या नव्या काळात डगमगण्याचे कारण नाही. आमच्या दिशा आणि वाटा आत्ता आम्हीच ठरवायला हव्यात. हे जोपर्यंत आम्ही लक्षात घेवून अंमलात आणत नाही तोपर्यंत आम्ही प्राथमिक लढ्यातच गुंतून राहू !