Breaking News

मुख्यमंत्री सकल मराठा समाजासोबत चर्चा करणार : चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 21 - मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षणाबाबत सकल मराठा समाज राज्य सरकारसोबत चर्चेला तयार असल्याच्या निर्णयाचे राज्य शासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. सकल मराठा समाजासोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरात लवकर वेळ घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने नेमकी कुणाशी चर्चा करावी, हा मुद्दा वारंवार उपस्थित होत होता. आता सकल मराठा समाजाने स्वतःहून राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविल्याने समाजाच्या मागण्यांबाबत चर्चेची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे. सकल मराठा समाजाच्या या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच घेतले आहेत. सकल मराठाच्या या चर्चेच्या निर्णयामुळे त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यास शासनास मदत होईल, असा विश्‍वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.