तापमानाचा उच्चांक !
दि. 03, एप्रिल - भारत हा देश केवळ सांस्कृतिकदृष्ट्याच विविधतेने नटलेला नाही तर भौगोलिक व नैसर्गिक विविधतेनेही संपन्न आहे. पण या प्रत्येक बाबीचे काही गुण असतात तसे दोषही असतात. भारत हा मौसमी हवामानाचा प्रदेश असल्यामुळे पावसाळा, हिवाळा व उन्हाळा अशा तिन्ही श्रतुंचा हवामानाचा प्रभाव येथील वातावरणात निश्चितपणे पडलेला असतो. सध्या सुरु असलेल्या उन्हाळामुळे राज्यातच नव्हे तर देशभर उष्णतेची लाट आली आहे. पर्यावरणाचा र्हास झाल्यामुळे उष्णतेत वाढ, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ अशा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यासाठीच शाश्वत विकासाची संकल्पना पुढे आली. देशाचा राज्याचा विकास साधत असतांना पर्यावरणपुरक विकास साधणे गरजेचे आहे. मात्र याकडे डोळेझाक करणे चालू आहे, परिणामी यामुळे सर्वसामान्यांना व्यक्तींना जेव्हा आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर पडावे लागते तेव्हाच अशा व्यक्ती उष्माच्या बळी पडून आपला जीव गमावतात. पर्यावरणाकडे सातत्याने दूर्लक्ष केल्यामुळे, झाडांच्या कत्तली अलिकडच्या काळात मोठया प्रमाणावर होत आहे. शहरांमध्ये तर झाडांची संख्या घटल्याने तापमान मोठया प्रमाणात वाढत आहे. तसेच वाढत्या तापमानाबरोबरच अतिनील किरणांचाही मोठा त्रास भोगावा लागत आहे. या किरणांचे प्रमाण सध्या प्रमाणापेक्षा अधिक आढळले आहे. औद्योगीकरणाद्वारे करोडो रूपये कमावणारे, विकासाच्या नावाखाली पर्यावरणासाठी खेळणारे, यांना या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणावा तसा जाणवत नाही, कारण आरामदायी ऑफिसमध्ये एसीच्या थंडगार वातावरणामध्ये राहणार्यांना मात्र त्याची झळ जाणवत नाही त्याचा फटका मात्र सर्वसामान्यांनाच बसतो, आणि त्याचे पर्यावसान त्यांना आपला जीव गमवावा लागतो. विदर्भात तर जनजीवन विस्कळित झाले आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्हयाचे तापमान जवळपास 42-43 अंश सेल्सिअस झाले आहे. रायगड जिल्हयातील भिरा येथे राज्यातील सर्वाधिक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही अलीकडच्या काळातील सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. महाराष्ट्रामध्ये उन्हांच्या तडाख्यामुळे पाच जणांना जीव गमवावा लागला आहे, तर तेलगंणा व आंध्रामध्ये देखील तापमानाने उच्चांक गाठला आहे. अद्याप मे महिना उजाडयाचा आहे, त्यामुळे येणार्या काही दिवसांत देशभरात उष्णतेची भीषण लाट बघावयास मिळणार आहे, याचा अंदाज एप्रिलमध्येच बघायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांनी काय करावे अथवा काय करु नये याबाबत शासनाच्या महसूल विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. एवढेच नव्हे तर उष्णतेच्या कालावधीत नागरिकांचा बचाव करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी सूचनाही जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. असे असले तरी, उन्हाचा तडाखा सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. कारण सर्वसामान्यांना रोजच्या रोटीची भ्रांत असते, प्रत्येक दिवस काम केल्याशिवाय त्यांना रोजीरोटी मिळत नाही, त्यांना मात्र या उष्णतेचा सामना करावाच लागणार आहे. तापमानवाढीच्या झळा या सर्वसामान्यांना अधिक सहन कराव्या लागणार आहेत.
