Breaking News

चीनच्या ऐतिहासिक शॉनहुवा गॅलरीमध्ये फडकला तिरंगा

नाशिक, दि. 22 - इतिहासात पहिल्यांदाच चीनच्या ऐतिहासिक शॉनहुवा गॅलरीमध्ये तिरंगा फडकला आहे. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक वास्तूच्या गॅलरीत तिरंगा फडकण्याचा मान नाशिकचे सुप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्यामुळं मिळाला आहे. तब्बल 1700 वर्षांचा इतिहास लाभलेलेल्या चीनच्या शांघाईतली शॉनहुवा वर्ल्ड हेरिटेज गॅलरीत 8 एप्रिलपासून चीनच्या ध्वजासह भारताचा तिरंगाही मोठा दिमाखात फडकतो आहे. इतिहासात पहिल्यांदाच आपल्या तिरंग्याला हा मान मिळवून असून, हा मान नाशिकचे जगप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्यामुळे मिळाला.
प्रफुल्ल सावंत यांच्या कुंचल्यांनी साकारलेल्या अप्रतिम कलाकृतींचं प्रदर्शन शॉनहुवा गॅलरीत भरवण्यात आलं आहे.  प्रफुल्ल सावंत यांच्या कलेसोबतच, त्यांच्या मायदेशाच्या सन्मानासाठी गॅलरीवर 8 मेपर्यंत तिरंगा फडकवण्यात येणार आहे. प्रफुल्ल सावंत हे जलरंगातून साकारलेल्या चित्रांसाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रातील जिवंतपणा चीनला चांगलाच भावला. म्हणूनच शॉनहुवा गॅलरीत सोलो प्रदर्शन भरवण्याची संधी प्रफुल्ल सावंत यांना देण्यात आली.