Breaking News

स्वच्छ भारत अभियानात सेंट्रल बँकेचे योगदान

अहमदनगर, दि. 02 - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान देशभर राबविले जात आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने या अभियानास प्रतिसाद देत पाईपलाईन रोड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 
या मोहिमेत क्षेत्रीय प्रबंधक पी. वाय. वैंगणकर, एलडीएम राजेंद्र दायमा, व्ही. टी. हुडे, डी. पी. काळे, शाखाधिकारी पी. डी. सावंत, उद्धव देशमुख, पी. एल. कुलकर्णी, बी. डी. शिरसाठ, वहाडणे, व्ही. आर. सोनटक्के, संपत नलवडे, निखील वारे यांच्याबरोबरच बँकेचे माजी अधिकारी व कर्मचारी देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. याप्रसंगी सुट्ट्या पैशांची अडचण असणार्‍या भाजीवाले, चहावाले व टपरीधारकांना यांना बँकेच्या वतीने 1 व 2 रुपयांची सुट्टी नाणी देण्यात आली.
यावेळी बोलताना क्षेत्रीय प्रबंधक पी. वाय. वैंगणकर म्हणाले की, स्वच्छ परिसरामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. आपला परिसर स्वच्छ ठेवला, तर शहर स्वच्छतेसाठी आपलाही हातभार लागतो. नागरिकांनी घरातील कचरा कुंडीतच टाकावा. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नये. शहर स्वच्छ व सुंदर असेल, तर उद्भवणारे आजार आपोआप दूर होऊ शकतात. प्रत्येकाने स्वच्छता करायला स्वतःपासून सुरुवात करावी. स्वतः कृती केल्यास त्याचा परिणाम तुम्हाला लगेचच दिसून येईल, असे ते म्हणाले.
दायमा म्हणाले की, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने बँकिंग क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकीचे भान कायम ठेवत सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. नोटाबंदीसंदर्भात बँकेने जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले आहेत. नुकतेच बँकेच्या माध्यमातून देहरे येथे मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन डी. पी. काळे यांनी केले, तर आभार उद्धव देशमुख यांनी मानले.