Breaking News

मन वढाय वढाय कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद!

बुलडाणा, दि. 23 - बहिणाबाईंचा जन्म 1880 मध्ये असोदा (जळगांव खा.) या खेड्यात झाला. खेड्यात बालपण गेले. शिक्षणाची संधी त्यांना मिळाली नाही. सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक साधारण शेतकरी, अशिक्षित स्त्री असताना शारदेच्या दरबारात एक श्रेष्ठ कवयित्री म्हणून त्यांनी मानाचे स्थान मिळविले. रोजचे दैनंदिन जीवन जगताना जे दिसले, जाणवले, भासले, प्रत्ययाला आले ते इतरांना सांगत असतानाच ते काव्यरूपात अवतरले. बहिणाबांची गाणी म्हणजे एक अमृतवाणीच. 
अशा या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवर नागपूर येथील नाविन्यकला अकादमीने मन वढाय वढाय हा कार्यक्रम दि. 21 एप्रिलला स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सादर केला. गर्दे वाचनालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त्य गर्दे वाचनालय आणि राजयोगी युवा मंचच्या वतीने सदरहू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा घाटमाथ्यावर लोकगीते या पुस्तकाच्या लेखिका डॉ. इंदूताई लहाने ह्या होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष केशवराव एकबोटे, कार्यवाह मिनानाथ तारे, सहकार्यवाह गोकुल शर्मा, सदस्य दिवाकरराव देशपांडे आणि राजयोगी युवा मंचचे अध्यक्ष उदयभाऊ देशपांडे, कार्यवाह आशुतोष वाईकर, वाचनालयाचे माजी अध्यक्ष बॅ. टी. एस. पाटील यांचे चिरंजीव दिनकरराव पाटील सपत्निक उपस्थित होते. सुरूवातीला दीपप्रज्वलीत करून विद्येची देवता सरस्वती आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अध्यक्षा डॉ. इंदूताई लहाने, सौ. वंदना देशपांडे, माधुरी आशिरगडे, अपर्णा केळकर, अपेक्षा देशपांडे, विशाल देशपांडे, अपर्णा येगांवकर, दिनकरराव पाटील यांचे गर्दे वाचनालय आणि राजयोगी युवा मंच यांच्या वतीने सौ. भाग्यश्री तारे, सौ. नंदाताई देशपांडे, सौ. प्रगती सातपुते, सौ. दिपाली पाटील, सौ. अश्‍विनी वाईकर, अ‍ॅड. राजेश वानखेडे, सौ. निताताई देशपांडे, उदय देशपांडे, दिवाकरराव देशपांडे, संतोष सातपुते यांचे हस्ते गुलाबपुष्प व ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले.
सौ. वंदनाताई देशपांडे यांच्या पुढाकाराने आणि उदय देशपांडे यांनी राजयोगी युवा मंचचे गठन करून स्व. भास्करराव देशपांडे यांची हा कार्यक्रम घेण्याची इच्छा पुर्ण केल्याचे ग्रंथमित्र नेमीनाथ सातपुते यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. तर राजयोगी युवा मंचची स्थापना आणि उद्देशाची माहिती गिरीष वाईकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. अध्यक्षीय मनोगतानंतर पार्श्‍वगायिका अपर्णा केळकर यांनी माझी माय सरस्वती, माले शिकविते बोली या प्रार्थना गिताने कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर आखजीचा आखजीचा, मोलाचा सन देखा जी। निंबावरी निंबावरी, बांधला छान झोका जी॥ हे गाणे सादर करून माहेरी आलेल्या सासुवाशिणीचा हा झोका माहेरापर्यंत जाऊन सासरपर्यंत लगेच परत कसा येतो याचे गायिका अपेक्षा देशपांडे यांनी चित्रण उभे केले. त्यानंतर आज माहेराले जाणे, झाली झाली ओ पहाट। आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट॥ ही माहेरच्या मायेने ओथंबलेली कविता अपर्णा केळकर यांनी सादर केली. खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा खोपा। सुगरणीचा चांगला देखा, पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला॥ तिचा पिलामध्ये जीव, जीव झाडाले टांगला॥ या कवितेद्वारे आईच्या मायेला अंत नसतो हे सांगितले. आराई आणि इतर काही कविता राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका माधुरी आशिरगण यांनी गाऊन रसिकांची मने जिंकली. विशाल देशपांडे यांनी गायिलेल्या मन वढाय वढाय या गाण्याला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे बहारदार संचालन अंजलीताई परांजपे आणि अपर्णा येगांवकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदय देशपांडे, गिरीष वाईकर, श्रीकांत कुळकर्णी, सचिन बल्लाळ, अनिल पालकर, सुनील सरकटे यांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाला पत्रकार, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.