Breaking News

निवडणूक आयोग 16 लाख 15 हजार व्हीव्हीपीएटी यंत्रांची खरेदी करणार

नवी दिल्ली, दि. 24 - पुढील दोन वर्षांत 16 लाख 15 हजार व्हीव्हीपीएटी यंत्रे म्हणजे खरेदी करणची तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे. या यंत्रातून मतदाराला आपण कोणाला मतदान केले हे यंत्राद्वारे दिल्या जाणार्‍या पावतीतून कळू शकणार आहे . या यंत्रांचा वापर 2019मधील लोकसभा निवडणुकांसाठी केला जाणार आहे. आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड व भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपन्यांना याबाबतचे पत्र पाठवले आहे. त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने 3,173.47 कोटी रुपयांच्या 16 लाख 15 हजार व्हीव्हीपीएटी यंत्रांच्या खरेदीच्या आयोगाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. आयोगाने या यंत्रांचा वापर 2017-18 व 2018-19मधील निवडणूकांसाठी केला जाईल असे त्या प्रस्तावात म्हटले आहे. आयोग या दोन कंपन्यांकडून सप्टेंबर 2018पर्यंत ही यंत्रे खरेदी करणार आहे.
यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढणार असून त्याने मतदारांचा आपण कोणत्या पक्षाला मत दिले आहे हे जाणून घेण्याचा अधिकार अबाधित राहणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी याविषयी बोलताना सांगितले. यामुळे निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवरील मतदारांचा विश्‍वास वाढेल, असेही ते म्हणाले.