Breaking News

विरोधीपक्ष निवडीच्या गोंधळामुळे महानगरपालिका बजेट सभा तहकूब

। विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी आक्रमक; महापौरांच्या आसनासमोर घोषणाबाजी

अहमदनगर, दि. 30 - विरोधी पक्षनेत्याची निवड केल्याशिवाय महापालिकेच्या अंदाजपत्रकावर चर्चा होवू देणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेत विरोधी काँग्रेस  व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिकेच्या महासभेत गोंधळ घातला. महापौर सुरेखा कदम यांच्या आसनासमोर जावून नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी  अशा घोषणा देण्यात आला. त्यामुळे महासभेत पूर्ण गोंधळ उडाला होता.
महापालिका प्रशासनाने बनविलेल्या 541 कोटी 20 लाख रूपयांच्या अंदाजपत्रकावर आजपासून महासभेत चर्चा केली जाणार होती. दुपारी 1 वाजता महापौर  सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली महासभेस सुरूवात झाली. यावेळी उपमहापौर श्रीपााद छिंदम, आयुक्त दिलीप गावडे यांच्यासह सर्व खात्याचे अधिकारी  उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी विरोधी पक्ष नेत्याची निवड का केली नाही? ही निवड केल्याशिवाय सभा चालू देणार नाही,  असा इशारा दिला. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली. महापौरांनी त्यांना शांत  राहाण्याचे सांगितले परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक भूमिकेवर ठाम होते. विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवर महापौरांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी करत माजी  महापौर अभिषेक कळमकर, संपत बारस्कर यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर सुरेखा कदम यांच्या आसनासमोर जावून नही चलेगी नही  चलेगी दादागिरी नही चलेगी अशा घोषणा दिल्या. यामुळे सभेत गोंधळ उडाला होता. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन  केले. परंतु विरोधकांचा गोंधळ कायम होता. विरोधी पक्षनेत्याची निवड नसतानाही महासभा का घेतली असा सवाल कळमकर यांनी महापौरांना केला. त्यावर  महापौर कदम म्हणाल्या की, गटनेतेपदाचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यात आलेली नाही. राष्ट्रवादीने तर एक वर्षे विरोधी  पक्षनेत्याची निवड केली नव्हती पण आम्ही सर्व निवड करत आहोत. महापौरांच्या स्पष्टीकरणावर विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधी पक्षनेत्याच्या  निवडीशिवाय अंदाजपत्रकावर चर्चा न करण्यावर विरोधक ठाम राहिल्याने महापौरांनी अर्ध्यातासासाठी सभा तहकूब केली.