Breaking News

मनपा निवडणुकीसाठी र्ट्यु व्होटर ऍपचे प्रशिक्षण उत्साहात

लातूर (प्रतिनिधी), दि. 08 - राज्य निवडणुक आयोगाने निवडणूकीचे कामकाज अधिक पारदर्शक व्हावे याकरीता संगणक प्रणालीचा वावर सुरु केला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून निवडणूक संदर्भातील विविध कामे संगणक अथवा स्मार्टफोनच्या माध्यमातून करण्यास प्राधान्य दिले आहे. लवकरच लातूर मनपाची निवडणूक होवू घातलेली असून या निवडणूकीतही संगणक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहिती होवून र्ट्यू व्होटर ऍपचे प्रशिक्षण देण्याकरीता घेण्यात आलेली कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.
लातूर महानगरपालिका निवडणूकीत संगणक प्रणाली व स्मार्टफोनचा वापर करण्यात येवून निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात येणार आहे. मतदार यादीतील नाव शोधण्यापासून उमेदवारांनी खर्च सादर करण्यापर्यंत ही सर्व प्रक्रिया र्ट्यू व्होटर ऍपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ऍपचे सर्वांना प्रशिक्षण मिळावे याकरीता निवडणूक निर्णयाच्या आदेशानुसार मुरलीधर भुतडा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेत प्रथम अधिकारी व कर्मचारी यांच्या करिता दोन तास तर राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, ईच्छुक उमेदवार व नगरसेवक यांच्याकरीता दोन तास कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळेत या प्रणालीच्या माध्यमातून मतदार यादी संदर्भातील हरकती, सुचना सादर करणे तसेच मतदारांचे नाव शोधणे यासह नामनिर्देशन पत्र भरणे, कंट्रोल चाट तयार करणे व उमेदवारांने दैनंदिन खर्च सादर करणे आदि निवडणूक संदर्भातील कामे होणार आहेत. याकरीता अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ईच्छुक , कार्यकर्ते व नगरसेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण प्रसंगी मनपा आयुक्त रमेश पवार, उपायुक्त  संभाजी वाघमारे, नगररचनाकार सुनिल देशपांडे, निवडणुक विभाग प्रमुख सुनिल चनवडे, मुख्य लेखाधिकारी श्रीमती सविता जंपावाड, सहा. आयुक्त श्रीमती उज्वला शिंदे, लेखाधिकारी एम.एस भिसे,  अनंत आळंदकर, दिपक पवार, महेश शर्मा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी व राजकीय पक्षाचे संभाव्य उमेदवार, विद्यमान नगरसेवक आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.