Breaking News

मराठवाड्यातून वैचारिक उठाव व्हावा-ऍड. देशपांडे

लातूर (प्रतिनिधी), दि. 08 - मराठवाडा प्रांत राजकीयदृष्ट्या परिपूर्ण आहे, सर्वांचे लक्ष राजकारणाकडे असल्याने येथील अन्य क्षेत्रांच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. मराठवाड्याला आर्थिक, कृषि, सिंचन, सामाजीक, शैक्षणिक, औद्योगिक आदी क्षेत्रातील विकासासाठी वैचारिक उठाव व्हावा, तरच विकासाला चालना मिळेल, असे मत डाव्या विचारसरणीचे खंदे पुरस्कर्ते कॉ. ऍड. भगवानराव देशपांडे यांनी सोमवारी सायंकाळी येथे बोलताना व्यक्त केले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऍड. भगवानराव देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यानिमित्त मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर जिल्हा शाखेच्यावतीने येथील डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात त्यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव नरहरे हे होते. मंचावर उषाताई देशपांडे, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे यांची उपस्थिती होती.
जनतेच्या उठावामुळे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात प्रगती झाली. मराठवाड्याला सुदैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अशी दोन विद्यापीठे लाभली आहेत. या विद्यापीठांच्या माध्यमातून आपणाला बरीच प्रगती साधता येऊ शकते. त्यासाठी जनतेचा रेटा गरजेचा आहे, असे नमुद करून कॉ. ऍड. देशपांडे म्हणाले की, राष्ट्रीय महापुरूषांनी, विचारवंतांनी जे कार्य केले ते नव्या पिढीसमोर ठेवण्याची गरज आहे, त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल. ध्येयवादाची, विचाराची ठिणगी निर्माण केली नाही तर कार्यकर्ते मरगळलेलेच राहणार याकडे त्यांनी लक्ष वेधले. मी माझ्या आयुष्यात विचारांच्या चळवळीमुळे विचारांची ज्योत कधीच विझू दिली नाही. यातून मला काय मिळाले ते महत्वाचे नाही, अशीच जिद्द वडीलधारी मंडळींनी आजच्या तरूणाईमध्ये निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
 परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव नरहरे यांनी तरूणांनी मराठवाडा जनता विकास परिषदेत यावे असे आवाहन केले. जयप्रकाश दगडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. सुर्यनारायण रणसुभे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. यावेळी विविध संघटनांनीही त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास विधीज्ञ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मराठवाडा जनता विकास परिषदेचे सचिव पांडुरंग देडे व उपाध्यक्ष ऍड. शेखर  हविले यांनी केले. कार्यकारिणीचे सदस्य प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांनी आभार मानले.