Breaking News

पराभवाच्या भितीमुळेच लातुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी- पालकमंत्री

लातूर (प्रतिनिधी), दि. 01 - गेल्या लोकसभा, विधानसभा आणि आता नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्येही भाजपची विजयी घोडदौड कायम असल्याचा लातूर जिल्हयातील काँग्रेसने धसका घेतला असून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पराभवाच्या भितीमुळेच काँग्रेसने महाराष्ट्रात पहिल्यांदा लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे लागून आघाडी केल्याचा आरोप करीत दोन्ही काँग्रेसनी हातमिळवणी करणे यातच भाजपाचे यश निश्‍चित आहे असे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. 
भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत सिमती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ व मतदारांचा मेळावा 30 जानेवारी रोजी शिवली येथे झाला. यावेळी संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ङ मुक्तेश्‍वर वागदरे हे होते. तर भाजपा नेते रमेशअप्पा कराड, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय क्षीरसागर, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, अरविंद कुलकर्णी, भाजपाचे औसा तालुकाध्यक्ष सुर्यकांत शिंदे, बाजार समितीचे संचालक गोविंद नरहरे, लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, औसा नगरपालिका गटनेते सुनील उटगे, पंचायत समिती सदस्य पदमाकर चिंचोलकर, बालाजी शिंदे, गुणवंत करंडे, संदिपान शेळके, रमेश वळके, राजकिरण साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोतलाना संभाजी पाटील म्हणाले की, गेली 35 वर्षे जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असूनही जिल्हयातील ग्रामीण भागातील प्रश्‍न कायम आहेत. उजनी, भादा, आशिव व परिसरातील रस्त्यांच्या कामासबंधी पाच वर्षापुर्वी नारळ फोडूनही या भागातील रस्त्यांचे काम झाले नाही. मात्र मी गेल्या तीन महिन्यात जिल्हयात 100 किलोमीतरचे रस्ते केले असून जिल्हा परिषद निवडणुकीनंतर या भागासह जिल्हयातील सर्व रस्त्यांचे काम 2018 पर्यंत पूर्ण करणार आहे. तसेच जिल्हयातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध लोकहिताच्या योजना राबविण्यावर भर देणार आहे. यावेळी संभाजी पाटील यांनी भाजपाच्या वतीने जिल्हा परिषदेसाठी उजनी येथुन संदिपान शेळके, आशिव - रमेश वळके तर भादा येथून बालाजी शिंदे यांची उमेदवारी जाहिर केली.