Breaking News

गडकरी यांचा पुतळा बसविण्याचा कलाकारांचा निर्धार; आयुक्तांना निवेदन सादर

पुणे, दि. 01 -  थोर नाटककार राम गणेश गडकरी यांचा संभाजी बागेतील पुतळा बसविण्यात यावा, या मागणीचे निवदेन आज पुणे महापालिका आयुक्त कुणाल  कुमार यांना मोहन जोशी, पुष्कर श्रोत्री, शरद पोंक्षे, श्रीरंग गोडबोले या शिष्टमंडळाने दिले. 
 पुण्यात मागील महिन्यात संभाजी बागेतील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काढला. त्यानंतर पुणे शहरात त्याचे मोठ्या प्रमाणावर  पडसाद उमटले असून या घटनेचा नाट्य आणि सिनेसृष्टीतून निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेला महिनाभराचा कालावधी उलटून गेला. या पार्श्‍वभूमीवर आज  संभाजी बागेत पुतळा बसविण्याचा निर्धार कलाकार मंडळींनी केला होता. मात्र, त्यांना त्याची परवानगी पोलिसांनी नाकारली.
 त्यामुळे त्यांनी मनोहर मंगल कार्यालयात कलाकार मंडळीच्या वतीने राम गणेश गडकरी यांचा तयार केलेला पुतळा सभागृहात ठेवण्यात आला. या दरम्यान, ज्येष्ठ  कलाकार मोहन आगाशे, मोहन जोशी, शरद पोंक्षे,  पुष्कर श्रोत्री, अमोल पालेकर, श्रीरंग गोडबोले, अशा अनेक दिग्गज कलाकारांची भाषणे झाली.
 यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी म्हणाले की, राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढला ही निषेधार्थ बाब आहे. त्याच बरोबर येत्या काळात कायदा आणि  शांततेच्या मार्गाने पुतळा बसविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 यावेळी नाटककार शरद पोंक्षे म्हणाले की, राम गणेश गडकरी यांचे नाटक त्यांना समजले नाही. अशा व्यक्तींना खर्‍या अर्थाने समजणे जरुरीचे आहे. यासाठी  येत्या काळात राज्यातील विविध भागात त्यांचे नाटक सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यांचा पुतळा बागेमध्ये  बसवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.