Breaking News

जैनापूरात घरफोडी ः सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास

सांगली, दि. 01 - जैनापूर (ता.शिरोळ) येथे घरात शिरून पहाटे साडेतीन ते पावणे पाचच्या सुमारास घरातील लोखंडी कपाट, शोकेसचे लॉकर, व पितळी डब्यातील 8.1 तोळे सोन्याचे दागिने, तीन जोड पैंजन व साडेसात हजार रूपये रोकड असा एकूण दोन लाख 25 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 
घटनेनंतर पोलिसांनी श्‍वानपथक घटनास्थळी पाचारण केले होते.मात्र चोरट्यांचा माग लागला नाही. या चोरीपूर्वी चोरट्यांनी निमशिरगांव येथील मोटरसायकलही चोरल्याचे स्पष्ट आहे. ती सकाळी सांगली-कोल्हापूर बायपास मार्गावर आढळली. चोरटयांनी घरातील साहित्य बाहेर आणून विस्कटले. याबाबत अनिल बाळासाहेब बिरंजे (वय 28, रा.शिवाजी चौक, जैनापूर) यांनी फिर्याद दिली आहे. बिरंजे यांचे वडील पहाटेच्या सुमारास शौचालयासाठी घराचे मागील दार उघडून बाहेर गेल्यानंतर घरात प्रवेश करून घरातील व्यक्ती झोपलेली असताना चोरट्यांनी धाडसी चोरी केली. वडील आतून लावलेली कडी काढून चोरटे पसार झाले. चोरीत लोखंडी कपाटातील दिड तोळ्याचे नेकलेस, दिड तोळ्याचे दोन गंठण, अर्धा तोळ्याची दोन चेन, शोकेसमधील सहा अंगठ्या, अर्धा तोळ्याचे कानातील टॉप्स, पितळी डब्यातील एक तोळ्याची बोरमाळ तसेच लोखंडी शोकेसमधील पैंजन तीन जोड व साडेसात हजार रूपयाची रोकड असा ऐवज लंपास केला. घटनेनंतर जयसिंगपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.बी.कदम व पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पंचनाम्यात 1 लाख 65 हजाराचा ऐवज चोरीस गेल्याचे नमुद  आहे.