Breaking News

राजपत्रीत अधिकारी महासंघाच्या वतीने पुणे येथे ग.दि.कुलथे यांचा सत्कार

पुणे, दि. 01 - महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, पुणे जिल्हा समन्वय समिती जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वतीने आज सिंचन भवन पुणे  येथे महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे व महासंघाचे अध्यक्ष मनोहर पोकळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ  इंजिनियअर्सच्या राज्य अध्यक्षपदी  निवड झाल्याबद्दल सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महांमडळाचे कार्यकारी संचालक रा.ब.घोटे होते. यावेळी मुख्य अभियंता सर्वश्री ता.ना.मुंडे, एस.डी.  कुलकणी, आर.एन.ठाकरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही.एस.जाधवराव उपस्थित होते.
श्री. कुलथे म्हणाले, अधिकारी व कर्मचारी यांच्या करीता आगामी काळात धोरणात्मक उपाययोजना करुन शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे.  महासंघाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून  7 वा वेतन आयोग व 10 टक्के महागाई भत्ता यावर्षीच लागू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मुंबई  येथे शासकीय कामानिमित्त येणार्‍या राजपत्रित अधिकार्‍यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी महासंघाने 1381 चौ.मी. भूखंड ताब्यात घेतला आहे. या जागेवर  इमारत उभी करण्यासाठी महासंघातील अधिकार्‍यांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री. पोकळे म्हणाले, शासन व कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम महासंघाच्यावतीने करण्यात येत आहे. कर्मचार्‍यांनी यापुढील काळात विविध कौशल्ये  आत्मसात करुन जनतेचे कामे लवकरात लवकर पुर्ण करावी. महासंघाच्या कामकाजाबाबत तसेच राबविण्यात येणार्‍या विविध अभियानांबाबत माहिती दिली.
श्री. घोटे म्हणाले, महाराष्ट्रातील 73 अधिकारी संघटनांचा मिळून हा महासंघ आहे. कर्मचार्‍यांनी हक्काची जाणीव ठेवून कर्तव्य पार पाडावे. त्याचबरोबर दैनंदिन  कामकाज गतीने पार पाडावे.
मोहन साळवी यांनी आभार मानले. यावेळी विविध अधिकारी व कर्मचारी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.