Breaking News

जिल्हा परिषद-पंचायत समितीचे अर्ज स्विकारण्यास आजपासून सुरुवात

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रीया सुरु झाली असून बुधवार दि. 1 फेब्रुवारी 2017 रोजी पासून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहेत. सोमवार, दि. 6 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची अंतिम मुदत आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी व वैध उमेदवारांची यादी मंगळवार, दि. 7 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र माघार, अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व चिन्ह वाटप सोमवार, दि. 13 फेब्रुवारी 2017 रोजी करण्यात येणार आहे. 
नामनिर्देशन पत्रे स्विकारण्याची व्यवस्था येथील तहसिल कार्यालयात करण्यात आली आहे. गट निहाय स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नामनिर्देशन पत्र भरण्याच्या कालावधीत प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारातून कोणत्याही वाहनांना इमारतीच्या आवारात सोडण्यात येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. ओळखपत्रे दाखवून शासकीय वाहने व कर्मचार्‍यांच्या वाहनांना आत प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवारांचे व त्यांच्या प्रतिनिधींच्या वाहनांचे पार्कींग बाहेर करायचे आहे.
नामनिर्देशन पत्र भरताना उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात घोषणापत्र, शपथपत्र, निवडणुक चिन्हांच्या निवडी बाबतचे घोषणापत्र, निवडणूक लढवू इच्छितो त्या जागेचा तपशील, जातीचा तपशील, मतदार यादीतील उमेदवारांचा तपशील, उमेदवाराची शैक्षणिक आर्हता, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी घोषणापत्र, व्यवसाय व कामधंद्याचा तपशील, मत्ता व दायित्व तपशील, स्थावर दायित्व तपशील, मागील निवडणुक लढविलेला निवडणुकीचा तपशील यासह इतर बाबी भरावयाच्या आहेत. तसेच अर्जासोबत  शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र व सोबत ग्रामसभेचा ठराव, अनामत रक्कम भरल्याची पोहोच पावती, बँक खाते तपशील, इतर विभागातील असेल तर तर मतदार यादीची सत्य प्रत, राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवाराबाबतची नमुना 2 अ, नमुना 2 ब, जात वैधता प्रमाणपत्र, अथवा हमीपत्र व जात पडताळणी विभागाला अर्ज सादर केल्याची पोहोच इ. कागदपत्रे सोबत जोडावयाची आहेत.