Breaking News

मुथा आर्केडच्या मालकासह चार गाळेधारकांवर गुन्हे

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : येथील राजपथावर असणार्‍या मुथा आर्केड इमारतीच्या मुळ नकाशात बदल करत स्टोअरच्या जागेत बेकायदेशीर गाळे निर्माण केल्याप्रकरणी मोहन मोतीलाल मुथा यांच्यासह चार गाळेधारकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग लागल्यानंतर त्याठिकाणचा पंचनामा करताना हे बेकायदेशीर काम समोर आल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले.
सातार्‍यातील राजपथावर मुथा आर्केड नावाचे व्यापारी संकुल आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर असणार्‍या एका कपड्याच्या दुकानास दि. 15 रोजी शॉर्टसर्किटने आग लागली होती. ही आग नंतरच्या काळात इतरत्र पसरली आणि त्याचा फटका तळमजल्यावर असणार्‍या इतर दुकानांना बसला. ही आग आटोक्यात आणताना अग्नीशामक दलाच्या जवानांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. या घटनेचा पंचनामा करताना इमारतीच्या मुळ रेखांकनात मोठे बदल करत स्टोअरच्या जागेवर बांधकाम करत गाळे तयार केल्याचे समोर आले.
यानंतरच्या काळात त्या इमारतीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत नगरपालिकेस आराखडा करत असताना इमारत बेसमेंट, तळमजला व त्यावरील तीन मजले अशा स्वरुपाची असल्याचे तसेच बेसमेंटची जागा स्टोअर अशी दाखविण्यात आल्याचे समोर आले. यानुसार त्याचा अहवाल करण्यात आला. याबाबतची तक्रार सातारा नगरपालिकेचे भाग निरीक्षक प्रकाश राजेशिर्के (रा. माची पेठ, सातारा) यांनी नोंदवली आहे. यानुसार मुथा आर्केडचे मालक मोहन मोतीलाल मुथा, गाळेधारक संतोष अहिरराव केंजळे, सुखेद विद्याचंद भंडारी, शक्ती अशोक दरेकर (सर्व रा. सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुळ रेखांकनात बदल करणे, स्टोअरच्या जागी गाळे उभारणे या कलमानुसार हे गुन्हे नोंदविले आहेत. हे गाळे 2000 पासून वापरात असल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. सातारा शहराच्या मुख्य भागातील अनेक इमारतींच्या रेखांकनात पार्किंग किंवा इतर कारणांसाठी राखीव ठेवलेल्या जागांचा नंतरच्या काळात नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी यांच्या हातमिळवणी करुन गाळे बांधण्यात आल्याचे यापूर्वीच्या काळात समोर आले होते. हे समोर येवूनही नगरपालिका कोणत्यातरी अज्ञात शक्तीच्या दबावामुळे कारवाई करण्याचे टाळत होती. आगीच्या घटनेनंतर इमारतीच्या आराखड्यात मोठे बदल केल्याचे समोर आले. याबाबतची तक्रार दाखल असली तरी नगरपालिकेने इतर इमारतींची पाहणी करत तसे बदल करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरु ठेवली पाहिजे.