Breaking News

‘पेटीएम मॉल’ नावाने रिटेल बाजारात पेटीएमची एन्ट्री

 नवी दिल्ली, दि. 01 - ऑनलाईन पेमेंटची सेवा देणार्‍या ‘पेटीएम’ कंपनीने आता रिटेल क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. पेटीएम कंपनीने सोमवारी ऑनलाईन आणि अँड्रॉईड अ‍ॅपवर आधारित ‘पेटीएम मॉल’ लॉन्च केलं आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या अ‍ॅपद्वारे 1.4 लाख विक्रेत्यांकडून ग्राहक फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तू खरेदी करु शकतील.
पेटीएम कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएम मॉल भारतीय ग्राहकांसाठी मॉल आणि मार्केट या दोन संकल्पनांचं एकत्रिकरण म्हणून सादर केलं जाईल. नियमांचं योग्य पालन करणार्‍या उत्पादन कंपन्या आपले प्रॉडक्ट्स पेटीएम मॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात येतील. सध्या अँड्रॉईड यूझर्ससाठी पेटीए मॉलचं अ‍ॅप विकसित करण्यात आलं आहे. लवकरच आयओएसवर चालणार्‍या अ‍ॅपल हँडसेटसाठी खास अ‍ॅप विकसित केले जाणार आहे. पेटीएमचे उपाध्यक्ष सौरभ वशिष्ठ यांनी सांगितले, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी पेटीएम मॉल अ‍ॅप महत्त्वाचं पाऊल  ठरणार आहे. ग्राहकांना विश्‍वासार्ह सेवा पुरवणं, हे आमचं ध्येय आहे आणि त्यादृष्टीने आम्ही सेवा पुरवू.