Breaking News

पत्रकारांसोबतच्या स्नेहभोजनाला ट्रम्प यांचा नकार

वॉशिंग्टन, दि. 27 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रतिनिधी संघटना (व्हाईट हाऊस करस्पॉण्डेंटस असोसिएशन-डब्ल्यूएचसीए) च्या वार्षित स्नेहभोजन कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नकार दिला. ट्रम्प यांच्या या कृतीने गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेला छेद दिला.
ट्रम्प यांनी ट्विटरवर याबाबतची घोषणा केली. यात त्यांनी आपण व्हाईट हाऊसच्या करस्पॉण्डेंटस असोसिएशनच्या वार्षिक स्नेहभोजन कार्यक्रमास उपस्थीत राहणार नसल्याचं, म्हणलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसे गोळा केले जातात. तसेच या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्षांसह वॉशिंग्टनमधले अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थीत असतात.
सीएनएनच्या वृत्तानुसार, यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन हे या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नव्हते. याचे कारण म्हणजे, 1981 मध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. पण तरीही त्यांनी फोनवरुन आपलं संबोधन दिलं होतं. तर एनपीआरने दिलेल्या वृत्तानुसार, माजी राष्ट्रनाध्यक्ष रिचर्ड निक्सन हे देखील 1972 साली या कार्यक्रमात उपस्थीत राहू शकले नव्हते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या मुख्य प्रवाहातील माध्यमांना देशाचा मुख्य शत्रू असल्याचं म्हणलं होतं. तसेच त्यांच्या या वक्तव्यापूर्वी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’, ‘सीएनएन’ आणि ‘बीबीसी’च्या प्रतिनिधींना व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत सहभागी होण्यास मज्जाव केला होता. यामुळे ट्रम्प प्रशासन आणि माध्यमांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते.