पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षेंनी संभाजी उद्यानात पाय ठेऊन दाखवावा ः संतोष शिंदे
पुणे, दि. 01 - संभाजी बागेत आज (मंगळवारी) गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसविण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करणार्या अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षे यांनी संभाजी बागेत पाय तर ठेऊन दाखवावा, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे. या दोघांनी कायद्याचा अभ्यास न करता हे पाऊल उचलले असल्याचेही शिंदे म्हणाले. पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षे यांनी संभाजी बागेत आज (मंगळवारी) गडकरींचा पुतळा पुन्हा बसविण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्या पार्श्वभूमीवर संतोष शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, गडकरींचा पुतळा काढण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी बसविण्यात आलेले तैलचित्र अनधिकृत असून ते लवकरात लवकर काढण्यात यावे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने ते काढू असा इशारा देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला. साहित्यिकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गडकरी यांना पाठींबा देण्यापूर्वी त्यांनी काय लिहून ठेवले हे वाचावे, सुपारी घेऊन भाजपचा अजेंडा राबवणे बंद करावे. हा सांस्कृतिक दहशतवाद संभाजी ब्रिगेड कदापि सहन करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, गडकरी यांच्या पुतळा पुन्हा बसविण्याचा कार्यक्रम घेणार्या श्रोत्री आणि पोंक्षेंना पोलिसांकडून महापालिका आयुक्तांच्या परवानगी शिवाय कार्यक्रम करता येणार नसल्याची समज देण्यात आली आहे. तसेच परवानगी शिवाय कार्यक्रम केल्यास कारवाई करणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.