मराठा समाजाचा लातूर जिल्ह्यात चक्काजाम;जनजीवन विस्कळीत
लातूर (प्रतिनिधी), दि. 01 -सकल मराठा मोर्चाने आजचा दिवस महाराष्ट्रभर गाजवला.आरक्षण व अन्य प्रश्नांसाठी आज राज्यभरात मराठा समाजाच्यावतीने विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यांचे हे आंदोलन म्हणजे जिल्हाभरात अक्षरशः ‘चक्का जाम’ ठरले. वैयक्तीक व सार्वजनिक वाहने अक्षरशः जागेवर थांबून राहिले. मात्र, दुपारी लातूरच्या शिवाजी चौकामध्ये आंदोलनकर्ते एकत्रीत येवून जिजाऊ वंदना घेवून चक्का जाम आंदोलन थांबविण्यात आले.
सकल मराठा मोर्चाने आजचा दिवस महाराष्ट्रभर गाजवला. चक्का जाममुळे राज्यातील जनजीवनाची गती अनेक ठिकाणी थंडावलेली दिसली. लातुरातही असेच झाले. राजीव गांधी चौक, शिवाजी चौक, पीव्हीर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, गरुड चौक, बाभळगाव चौक, गांधी चौक, बसवेश्वर चौक, औसा रोड आदी महत्वाच्या भागात लातुरच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम करुन मराठा समाजाच्या मागण्या अधोरेखित केल्या. या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहने बराच खोळंबलेली दिसली. काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी शाळा महाविद्यालयात जाणार्या मुले-मुली, अग्नीशामक दलाची गाडी, रुग्णवाहिका यांनाही अडवलं तर अनेक ठिकाणी या सर्वांना वाट करुन दिली. माणुसकीचेही दर्शन घडवले. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि नागरिकांची बाचाबाची झाली, पोलिसांशीही संघर्ष झाला. पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवला होता. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी आरक्षण समर्थनाच्या घोषणा दिल्या. जय भवानी-जय शिवाजी-जय जिजाऊ असा उदघोषही केला. असंच आंदोलन जिल्ह्यातील दहाही तालुक्याच्या ठिकाणी झालं. लातुरातील आंदोलनात कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला.
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, महिलांना संरक्षण द्यावं, शेतकर्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग थांबवावा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात असल्याची माहिती विधिज्ञ उदय गवारे यांनी दिली. मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणातलं काहीच नको, उलट मुस्लीमांनाही आरक्षण द्यावं. आजचं आंदोलन सीमावर्ती भागातही झाले, इतर समाजातल्या नागरिकांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे, 06 मार्चला मुंबईत महामोर्चा निघतोय. यात कोट्यवधी मराठा बांधव सहभागी होतील. मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्णय झाल्याचे गवारे यांनी सांगितले.
या आंदोलनादरम्यान जिल्हाभरातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य होती. तर अनेक वाहनधारकांनी आज विद्यार्थ्यांची वाहतूक केलीच नाही. पालकांनी स्वतःहून विद्यार्थ्यांनी शाळेत घेवून गेले. आंदोलनाच्या प्रत्येक ठिकाणी आंदोलन स्थगीत करत असताना राष्ट्रगीत घेण्यात आले, असे एका आंदोलनकर्त्याने सांगितले. ग्रामीण भागामध्येदेखील रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनाचा प्रचार अधिक झाल्याने आज अनेक वाहने सकाळी जागची हललीच नाहीत.